कसब्यात गाडीत सापडली पाच लाखांची रोकड
#पुणे
कसबा पोट निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी आणि पोलीस चेकपोस्टवर गाड्यांचा तपास करत असताना एका गाडीमध्ये पाच लाखाची रोकड आढळून आली आहे. तत्काळ कारवाई करत स्वारगेट पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांनी ही रोकड जप्त केली आहे. हे पैसे कशासाठी वापरले जाणार होते, याची माहिती अजून मिळाली नाही. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.
कसबा आणि चिंचवडमध्ये येत्या २६ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या दोन्ही ठिकाणी विजयासाठी भाजप आणि मविआकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यात १५ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सात तास बैठका घेतल्याने भाजपने विजयासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांना पाच लाखांची रोकड सापडली आहे. आढळून आलेल्या रकमेनंतर निवडणूक अधिकारी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये याबाबत अधिक चौकशी करत आहेत. याबाबत वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर यांनी माहिती दिली. पोलिसांनी कारवाई करत गाडी जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे . ज्या गाडीत ही रक्कम आढळून आली आहे, त्या गाडी चालकाकडे पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मात्र, चालकाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने निवडणुकीसाठीच ही रोकड आणली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जर ही रक्कम वाटण्यासाठी आणली असल्यास यातील काही रक्कम वाटण्यात आली आहे का, याचा तपास पोलीस करत असून, ऐन मतदानापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.