Sujit Patkar : ‘जम्बो’ गैरव्यवहारप्रकरणी सुजित पाटकरांवर गुन्हा

कोविडकाळात बनावट पार्टनरशिप डीडद्वारे जम्बो कोविड सेंटरची निविदा मंजूर करवून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह चौघांविरुद्ध शुक्रवारी (दि. २१) गुन्हा दाखल केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 22 Apr 2023
  • 05:46 am
‘जम्बो’ गैरव्यवहारप्रकरणी सुजित पाटकरांवर गुन्हा

‘जम्बो’ गैरव्यवहारप्रकरणी सुजित पाटकरांवर गुन्हा

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

कोविडकाळात बनावट पार्टनरशिप डीडद्वारे जम्बो कोविड सेंटरची निविदा मंजूर करवून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह चौघांविरुद्ध शुक्रवारी (दि. २१) गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही पोलिसांकडे तक्रार देऊन त्यात १०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. हा प्रकार २६ ऑगस्ट २०२० ते ९ सप्टेंबर २०२० या कालावधीत घडला. या संदर्भात पीएमआरडीएचे कार्यकारी अभियंता राजू लक्ष्मण ठाणगे (वय ४७) यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडकाळात शहरात आरोग्य सुविधा अपुऱ्या होत्या. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी युद्धपातळीवर कोविड रुग्णालय उभारणीसाठी मंजुरी दिली होती. खासदार राऊत यांचे निकटवर्तीय पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटलला शिवाजीनगर येथील सीओईपी मैदानावर कोविड जम्बो सेंटरची उभारणी आणि चालविण्याचे कंत्राट दिले होते. परंतु आरोपींनी जम्बो कोविड सेंटरच्या निविदा प्रक्रियेत निवड होण्यासाठी बनावट पार्टनरशिप डीड तयार केले. त्यामुळे पीएमआरडीएची फसवणूक झाली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

फिर्यादीत म्हटल्यानुसार, आठशे बेडसाठी निश्चित केलेल्या कोविड रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय तज्ज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नव्हते. रुग्णांना नाश्ता आणि भोजन वेळेत मिळत नव्हते, अशा तक्रारी कोविड सेंटरबाबत महापालिकेकडे येत होत्या. त्यावर महापालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच, सेवेतील त्रुटींमुळे पीएमआरडीएने लाइफलाइन हॉस्पिटलची सेवा खंडित केली होती.

या फसवणुकीविरोधात किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यात त्यांनी आरोपींकडून पीएमआरडीएकडे सादर केलेल्या भागीदारी पत्रांमध्ये तफावत असल्याचे म्हटले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने या प्रकरणाचा सविस्तर तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story