उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत; आता नजरा निकालाकडे

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. किरकोळ घटना वगळता या दोन्ही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. कसब्यात ५०.०६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. कसब्यात विनोबा भावे स्कूल, गंज पेठ मतदान केंद्रावर शेवटच्या अर्धा तासात तुफान गर्दी झाली होती. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ५१.५४ टक्के मतदान झाले होते, तर चिंचवडमध्ये सरासरी ५०.४७ टक्के मतदानाची नोंद झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 27 Feb 2023
  • 10:57 am
उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत; आता नजरा निकालाकडे

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत; आता नजरा निकालाकडे

कसब्यात ५०.०६ टक्के, चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदानाची नोंद

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. किरकोळ घटना वगळता या दोन्ही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. कसब्यात ५०.०६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. कसब्यात विनोबा भावे स्कूल, गंज पेठ मतदान केंद्रावर शेवटच्या अर्धा तासात तुफान गर्दी झाली होती. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ५१.५४ टक्के मतदान झाले होते, तर चिंचवडमध्ये सरासरी ५०.४७ टक्के मतदानाची नोंद झाली.

भाजप आणि महाविकास आघाडीने केलेल्या प्रतिष्ठेच्या या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेत्यांच्या फौजा प्रचारासाठी पुण्यात तळ ठोकून होत्या.

दोन्हीही बाजूने स्टार प्रचारकांची कोणतीच कमी नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील या निवडणुकीत उतरले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्याचे खासदार व भाजप नेते गिरीश बापट यांनी व्हिलचेअरवरून ऑक्सिजन सपोर्टवर येऊन मतदान केले. पक्षाच्या प्रचारातही बापट काही दिवस सक्रिय होते. यावेळी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांनीही मताधिकार बजावला. कसब्यात दिवसभरात मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपच्या गणेश बीडकरांवर पैसै वाटप करण्यात आल्याचा आणि काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. कसबा मतदारसंघातील मालधक्का चौकातील अशोक कॅाम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडला. गणेश बीडकर भाजप कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मारहाणीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी समर्थ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

चिंचवडमध्ये देखील सकाळपासूनच मतदानासाठी नागरिक बाहेर पडले होते. येथे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होत असल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत सरासरी ५०.४७ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे आता सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे, तर आता २ मार्चला कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. दरम्यान आज माझ्यासोबत मतदान करताना साहेब नाहीत. दरवेळी आम्ही दोघे मतदान करण्यासाठी घराबाहेर पडायचो, असे सांगत भाजपाच्या चिंचवडच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. मी एक लाख मतांनी निवडून येईल, असा विश्वासदेखील अश्विनी यांनी व्यक्त केला. दरम्यान सकाळी पिंपळे गुरव येथे भाजप माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांचे कार्यकर्ते गणेश जगताप यांच्यात वाद झाला. हा वाद एकमेकांकडे बघण्यावरून सुरू होऊन हाणामारीपर्यंत गेला. दळवीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शमीम पठाण यांचा भाजप माजी नगरसेवक मोना कुलकर्णी, जयश्री गावडे, विजय ऊर्फ शीतल शिंदे, अनुप मोरे यांचा जोरदार वाद झाला. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद वाढू दिला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story