सीए इन ‘क्राईम ॲक्ट’
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
उद्योगनगरी अशी जगभरात सार्थ ओळख असलेले पिंपरी-चिंचवड हे शहर आता गुन्हेगारांचे शहर होण्याच्या मार्गावर असल्याचे जाणवते. जमिनीच्या व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक झाल्याच्या समजातून खुनाचा कट रचणाऱ्या सनदी लेखपालासह (सीए) तीन दिवसांत तिघांना अटक करण्यात आली आहे.
जमिनीच्या व्यवहारात सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या समजातून चार्टर्ड अकाउन्टंटने मैत्रिणीच्या मदतीने भागिदाराच्या खुनाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार दरोडा प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांकडून ३ पिस्तूल आणि ४० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. विवेक नंदकिशोर लाहोटी (रा. शाहुनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या सीएचे नाव आहे. त्याने राजू माळी (रा. सोमाटणे फाटा) याच्या खुनाचा कट सुधीर अनिल परदेशी (वय २५, रा. केशवनगर, वडगाव मावळ) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मदतीने रचल्याचे उघड झाले आहे. खुनाचा कट उघडकीस येण्याची आठ दिवसांतील ही तिसरी घटना आहे.
सीए लाहोटी याच्या एका मैत्रिणीने सुधीर परदेशी याची भेट घडवून आणल्याने तिलादेखील आता अटक करण्यात आली आहे. जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या नावाखाली कुख्यात टोळीने सात पिस्तूल आणि २१ जिवंत काडतुसे आणल्याचे यापूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक विभागाचे प्रमुख, सहायक निरीक्षक अंबारिष देशमुख आणि पथकाने उघडकीस आणले होते. किशोर आवारे यांच्याशी संबंधित टोळीला अटक केल्यानंतर या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा .........(मोकको) अंतर्गत कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीवर २६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, या टोळीचा प्रमुख प्रमोद सोपान सांडभोर हा आवारे यांचा जवळचा सहकारी म्हणून मावळ पट्ट्यात परिचित आहे.
दरम्यान, आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या टोळीकडे पोलिसांचा तपास सुरू होता. तेव्हा सांडभोर याच्याबरोबर पूर्वी तळेगाव दाभाडेमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील साथीदार परदेशी यानेदेखील तीन पिस्तूल आणल्याची माहिती उघड झाली होती. त्यामुळे त्यालादेखील अटक करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे दोनच पिस्तूल आणि काही काडतुसे सापडली. परंतु, तिसरे पिस्तूल कोणाकडे आहे, याबाबत पोलिसांनी परदेशीकडे आपल्या पद्धतीने केलेल्या तपासातून सीए लाहोटी याचे नाव पुढे आले.
सीए असणाऱ्या लाहोटीकडे बेकायदा पिस्तूल का, याचा उलगडा पोलिसांना होत नव्हता. तसेच त्याला पकडण्यापूर्वी त्याच्याकडे पिस्तूल आहे का, याची खात्री होण्याची आवश्यकता होती. पोलिसांना याची खात्री झाल्यावर सीए लाहोटी याला अटक करण्यात आली. तेव्हा लाहोटीने जमिनीचे व्यवहार करणाऱ्या राजू माळीकडे सहा कोटी रुपये गुंतविले असल्याचे समोर आले. या प्रकरणात माळी याने फसवणूक केल्याचा संशय लाहोटीला होता. त्यामुळे त्याने ही बाब सध्या तळेगाव दाभाडे येथे एका कॅफेमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मैत्रिणीला सांगितली होती.
या मैत्रिणीची कुख्यात सांडभोरचा साथीदार परदेशीसोबत ओळख होती. परदेशीवर यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात दोन गुन्हे तर तळेगाव दाभाडे येथे सांडभोर याच्यासह एका गुन्ह्याची नोंद आहे. तिने लाहोटी आणि परदेशी यांची भेट घडवून दिली. त्यानंतर परदेशीने तीन पिस्तूल आणि ४० काडतुसे आणली होती. त्यातील एक पिस्तूल लाहोटी याच्याकडे ठेवण्यास दिले होते.
किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याची तयारी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पकडण्यात आले असून, त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. आमदार सुनील शेळके यांच्या भावाच्या हत्येचा कट या टोळीने रचला होता. हे प्रकरण उघडकीस येत असतानाच दुसरीकडे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार आणि पथकाने माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उधळून लावला होता. माथाडी व्यवसायातून हा कट रचला गेला होता. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांमध्येच जमिनीच्या व्यवहारातून व्यावसायिक माळी याच्या हत्येचा कट पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघड केला आहे.
आवारे यांच्या खुनानंतर गुन्हे शाखेच्या उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने आणि एकूणच गुन्हे शाखेने मावळ आणि आसपासच्या परिसरातील रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांची धरपकड केली असून, त्यातून आतापर्यंत तीन व्यक्तींच्या खुनाचे कट रचल्याचे उघड झाले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.