नशीब बलवत्तर म्हणूनच त्या मायलेकी वाचल्या
#मंचर
चिखली (तालुका) आंबेगाव येथे हांडे वस्तीत गुरुवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या मायलेकींना बिबट्याने अगदी जवळून दर्शन दिले. मात्र सावधगिरी बाळगत दोघींनी घराकडे धाव घेतली आणि त्यांचा जीव वाचला.
हांडे वस्तीत राहणाऱ्या अनिता विजयराव आढारी या त्यांच्या मुलीसोबत शेतात काम करत होत्या. त्यांच्यापासून पंधरा ते वीस फुटांवर बिबट्या उभा होता. सुरुवातीला त्यांना कुत्रा असल्याचा भास झाला, पण बिबट्या असल्याची खात्री पटल्यानंतर त्या व त्यांची मुलगी मनोरमा या दोघींनीही तेथून धूम ठोकली. नशीब बलवत्तर म्हणूनच मी व माझी मुलगी वाचलो, असे अनिता आढारी यांनी सांगितले. चिखली गाव व हंडे वस्ती आदिवासी डोंगरी भागात आहे. कांद्याच्या पिकात खुरपणी करून त्या तीस ते चाळीस मीटर अंतरावर असलेल्या घराकडे जाण्याच्या तयारीत होत्या. पंधरा ते वीस फूट अंतरावर उभा असलेला बिबट्या पाहून त्यांची अक्षरशः गाळण उडाली. ताबडतोब त्यांनी घरात जाऊन दरवाजा लावून घेतला. बॅटरीच्या प्रकाशात खिडकीतून बिबट्याचा अंदाज घेतला. त्यानंतर त्यांनी घराच्या जवळ फटाकेही वाजवले. आपण पाहिलेला बिबट्या पूर्ण वाढ झालेला असल्याचे अनिता आढारी यांनी सांगितले. विशेष म्हणजे दीड किलोमीटरच्या परिसरात अनिता आढारी यांचे एकमेव घर आहे. गेले दहा ते पंधरा दिवस या भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात वन खात्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय आढारी यांनी केली आहे.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.