कव्वालीचा कार्यक्रम बंद केल्याने हॉटेलमध्ये तोडफोड, मारहाण
#पुणे
हॉटेलमध्ये सुरू असलेला कव्वालीचा कार्यक्रम बंद केल्याने टोळक्याने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. त्यांची समजूत काढणाऱ्या मालकासह अंगरक्षकांना टोळक्याने मारहाण केली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सुमित चौधरी, संकेत सावंत, प्रफुल्ल गोरे, अजय मोरे, फिरोज शेख, अण्णा भंडारी, निखील वंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबात निखील मेदनकर (वय ३२ रा. वाघोली ) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंढव्यातील वॉटर्स बार अँड किचनमध्ये कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मध्यरात्री दीडनंतरही कव्वालीचा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे कव्वाली कार्यक्रमाचे संयोजक (इव्हेंट मॅनेजर) निखिल यांनी कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम बंद केल्याने आरोपी चिडले. त्यांनी साथीदारांना बोलावून घेतले. टोळक्याने गोंधळ घालून साहित्याची तोडफोड केली. उपाहारगृहाचे मालक तसेच अंगरक्षकांना मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक आर. व्ही. महानोर तपास करत आहेत.
गुंडांविरुद्ध मोक्का
रेल्वे स्टेशनजवळील ताडीवाला रस्ता भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ४४ गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाई केली आहे.
संघर्ष उर्फ भाव्या नितीन आडसुळ (वय २१), साहील राजू वाघमारे उर्फ खरखर सोन्या (वय २२), अतुल श्रीपाद म्हस्कर उर्फ सोनू परमार (वय २२, तिघे रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. गेल्या महिन्यात आडसुळ आणि साथीदारांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी आडसुळ, त्याचे साथीदार वाघमारे, म्हस्कर यांना अटक केली होती. आडसुळ, वाघमारे, म्हस्कर यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. त्यांनी ताडीवाला रस्ता भागात टोळी तयार करून दहशत माजविली होती. या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी तयार केला होता. प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस आयुक्तांनी आडसुळ टोळी विरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश दिले.
feedback@civicmirror.in