Kishor aware murdered : व्यावसायिक किशोर आवारेंचा खून

तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दि. १२) नगरपरिषदेत भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने घाव घालून हत्या करण्यात आली. प्राथमिक चौकशीत सहाजणांनी मिळून ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. किशोर आवारे यांच्या आई तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sat, 13 May 2023
  • 03:03 pm
व्यावसायिक किशोर आवारेंचा खून

व्यावसायिक किशोर आवारेंचा खून

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात गोळीबारानंतर कोयत्याने घातले घाव, सर्व सहा आरोपी फरार

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दि. १२) नगरपरिषदेत भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने घाव घालून हत्या करण्यात आली. प्राथमिक चौकशीत सहाजणांनी मिळून ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. किशोर आवारे यांच्या आई  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे तळेगावातील जिजामाता चौकात असलेल्या सरकारी क्रीडांगणाच्या इमारतीत नगरपरिषदेचे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. आवारे शुक्रवारी दुपारी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना भेटायला आले होते. 

 त्यानंतर ते इमारतीतून खाली आले तेव्हा दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांना पाठीमागून पकडून पुन्हा गोळीबार करीत कोयत्याने घाव घातले. आवारे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावरही आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने घाव घातले.

दीड ते दोन मिनिट हा सगळा प्रकार सुरू होता. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. काही अंतर गेल्यावर आरोपींनी एका बँकेच्या कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याची दुचाकी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य एका व्यक्तीला अडवून त्याची दुचाकी पिस्तुलाच्या धाकाने काढून घेत पळ काढला. दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

किशोर आवारे यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका स्थानिक पत्रकारालादेखील पिस्तुलाचा धाक दाखवला. या घटनेवेळी आवारे यांच्या बरोबर असलेल्या १० ते १५ जणांनी पळ काढला होता. या घटनेचे व्हीडीओ रेकॉर्डिंग तेथे उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये केले आहे. अवघ्या काही मिनिटांत ही माहिती शहरात पसरली. किशोर आवारे यांना तत्काळ सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

किशोर आवारे यांचा मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तेथे सिटी स्कॅनद्वारे किती गोळ्या लागल्या हे तपासण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, श्रीकांत डिसले यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चार पथके तयार करत आरोपींच्या शोधात ती पथके रवाना केली.

आरोपींनी ज्या दुचाकी जबरदस्तीने नेल्या होत्या, त्या घोरावडेश्वर रेल्वे स्टेशनच्या अलीकडे रेल्वे रुळाजवळ आढळून आल्या आहेत. या प्रकारानंतर तळेगाव दाभाडे पूर्ण बंद ठेवण्यात आले होते. मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्यावर सुमारे एक ते दीड हजार लोकांचा जमाव तेथे जमला होता. राजकीय वैमनस्य, पूर्व वैमन्यातून किंवा अन्य कोणत्या कारणातून ही हत्या घडवून आणली, हे समजू शकले नाही. मात्र हल्लेखोर पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून त्यातून काही आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. दीड महिन्यापूर्वी शिरगावच्या सरपंचाचादेखील अशाच प्रकारे खून करण्यात आला होता. तळेगाव दाभाडे आणि मावळ परिसरात गेल्या पंधरा वर्षांत अनेक राजकीय व्यक्तींच्या हत्या झाल्या असून आरोपींनी अत्यंत क्रूरपणे या घटना केल्याचे प्रत्येक वेळी समोर आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story