पुणे-सोलापूर महामार्गावर बस आणि ट्रकचा अपघात; दाेन मृत्यू, तीन जखमी
#करकुंभ
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव येणाऱ्या खासगी बस आणि मालट्रकचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ हद्दीत शनिवारी सकाळी हा अपघात घडला. पुढे चाललेल्या मालट्रकला सोलापूरकडून भरधाव येणारी खासगी आराम बस धडकली. बसमधील सर्व प्रवासी पुणे शहराच्या परिसरात राहणारे आहेत. कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहत कार्यालय चौकात पुण्याकडे जाणाऱ्या मालट्रकला पाठीमागून भरधाव येणाऱ्या बसने (यूपी.७८,एफएन.९२५७) धडक दिली.
या अपघातात बसमधील शोभा गुरुनाथ कलबंडे (वय ४५, रा.शाहू कॉलनी, वेदान्तनगरी, गल्ली नं ११, कर्वेनगर, पुणे-५२, मूळ रा. बडधळ, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) व महादेव सोपान भिसे (वय ४५, रा. रामनगर चिंचवड पुणे) हे दोघे गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला, तर राजश्री कल्याणराव मोरे (वय ३९, सध्या रा. चिंचवडनगर, पुणे. मूळ रा. उमरगा, जि उस्मानाबाद.) आकाश दत्तात्रय पोकरकर (वय २७, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे.), अनिल गुडाप्पा बडेगुर (वय २५, रा. सुतारवाडी रोड, भवानीनगर, पाषाण, पुणे) हे तिघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याशिवाय इतर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात बसच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. या संदर्भात गुरुनाथ चन्नाअप्पा कलबंडे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बसचालक सलीम महेबूब सडकवाला (रा. कासार शिरसी, ता. निलंगा, जि. लातूर) याने बस निष्काळजीपणे भरधाव चालवली आणि प्रवाशांचे जीव धोक्यात घातले, याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.