कचऱ्यासोबतच पेटवल्या महावितरणच्या केबल
विजय चव्हाण
सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटजवळ असलेल्या ओढ्यावरील पुलावर अज्ञाताने कचरा पेटवल्याने महावितरणच्या तीन ते चार उच्च आणि कमी दाबाच्या केबल जळाल्या असून एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी (दि. १४) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे खडकवासला, किरकटवाडी, नांदेड गाव, धायरी (रायकरमळा) तसेच नऱ्हेगावचा काही भाग अशा मोठ्या परिसरात वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी संबंधित ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, यापैकी काही भागांचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केल्यानंतर सुरळीत झाला. या आगीचा फटका परिसरातील तब्बल १८,५०० ग्राहकांना बसला.
ज्या ठिकाणी केबल जळाल्या आहेत, तेथे आजूबाजूचे व्यावसायिक कचरा आणून टाकतात. त्यांच्यापैकीच एखाद्या व्यावसायिकाने कचरा पेटवला असावा आणि त्यामुळे या केबल जळाल्या असाव्यात, असा अंदाज महावितरणचे अधिकारी व्यक्त करत आहेत.
नांदेड सिटी गेटजवळ असलेल्या ओढ्यावरील पुलावर अज्ञाताने कचरा पेटवला होता. यामध्ये महावितरणच्या केबल जळाल्याने अचानक वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी केली असता सदर ठिकाणी केबल जळाल्याचे निदर्शनास आले.
महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी म्हणाले, ‘‘अज्ञाताच्या कृत्यामुळे महावितरणचे तर नुकसान झाले आहेच, शिवाय यामुळे ग्राहकांनाही मनःस्ताप सहन करावा लागत आहे. मोठे काम असल्याने दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे. याबाबत अज्ञाताविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. असे प्रकार रोखण्यासाठी सजग नागरिकांनी तातडीने महावितरणशी संपर्क करणे आवश्यक आहे.’’
सध्या उन्हाचा तडाखा सुरू असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी, घरे किंवा इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका तसेच ओला कचरा टाकल्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धाेका निर्माण हाेत आहे. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू किंवा जाळू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, राेहित्र, डिस्ट्रीब्यूशन बाॅक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील जागेत घरातील कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. हा कचरा पेटवल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल तसेच इतर यंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. साेबतच या यंत्रणेला आग लागण्याची शक्यता आहे. वीजयंत्रणेला आग लागल्याने किंवा नादुरुस्त झाल्यामुळे वीजपुरवठाही खंडित हाेण्याचे प्रकार दिसून येत आहेत.
सध्या अनेक ठिकाणी वीजयंत्रणेजवळ टाकलेला कचरा पेटवून देण्याचे किंवा त्यात आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. ओव्हरहेड तारांखाली असलेल्या कचऱ्याचा ढिगारा पेटवल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे तारा वितळून वीजपुरवठा खंडित हाेण्याचा धाेका आहे. महावितरणने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या राेहित्रांना संरक्षक जाळ्या, कपाऊंड लावलेले आहे. परंतु, अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आत कचरा तसेच शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थांमुळे मांजर, उंदीर, घुशी, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शाॅर्टसर्किट हाेऊन वीजपुरवठा खंडित हाेताे. प्राण्याचा नाहक जीव जाण्याचेही प्रकार घडले आहेत. वीजयंत्रणेला आग लागल्याचे किंवा संभाव्य धाेका असल्याचे दिसताच १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टाेल फ्री क्रमांकांवर माहिती द्यावी, असे आवाहनही महावितरणने केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.