बंपिंग की जंपिंग ?

शहरातील मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. काही ठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत. अशा त्रासातून वाहनचालक जात आहेतच. मात्र, शहरात विविध ठिकाणी असलेल्या पावसाळी गटारांच्या लोखंडी जाळ्यांचे आकार बदलल्याने विविध ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. त्यातून गाडी आदळत वाहनचालकांना जावे लागत आहे. दुचाकी चालक, मोटारचालक आणि बसमधून प्रवास करणाऱ्यांना बंपिंग राईड घेतच जावे लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 6 Mar 2023
  • 02:28 am
बंपिंग की जंपिंग ?

बंपिंग की जंपिंग ?

पावसाळी गटारांच्या बदललेल्या आकारामुळे वाहनचालकांचा आदळत आपटत प्रवास

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

शहरातील मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. काही ठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत. अशा त्रासातून वाहनचालक जात आहेतच. मात्र, शहरात विविध ठिकाणी असलेल्या पावसाळी गटारांच्या लोखंडी जाळ्यांचे आकार बदलल्याने विविध ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. त्यातून गाडी आदळत वाहनचालकांना जावे लागत आहे. दुचाकी चालक, मोटारचालक आणि बसमधून प्रवास करणाऱ्यांना बंपिंग राईड घेतच जावे लागत आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवर लोखंडी पट्ट्या असलेली झाकणे पावसाळी गटारांवर लावण्यात आली आहेत. त्यावरून जड वाहने गेल्याने या लोखंडी पट्ट्या आतील बाजूस वाकल्या आहेत. त्यामुळे एकप्रकारचा खड्डा तिथे तयार झाला आहे. रस्त्याच्या समतल नसल्याने ही पावसाळी गटारे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. विशेषतः मेट्रोच्या कामामुळे विविध ठिकाणचे रस्ते अरुंद झाले आहेत. काही ठिकाणी मेट्रोने लोखंडी अडथळे लावत कामासाठी जागा केली आहे. तिथे तर हा प्रश्न तीव्रतेने जाणवत आहे. लोखंडी जाळी टाकायला जागा नाही आणि गेल्यास आदळ-आपट झाल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. काही नागरिकांनी याबाबत सीविक मिररकडे तक्रार केली होती. त्यानंतर 'सीविक मिरर'च्या प्रतिनिधीने वनाझ ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या मार्गाची पाहणी केली असता नागरिकांच्या निरीक्षणाशी तंतोतंत जुळणारा विदारक अनुभव आला.

वनाझजवळ मेट्रो पुलाखाली अशीच लोखंडी जाळी आहे. त्यात आदळत आपटत वाहन न्यावे लागते. नेहमीचा रस्ता असलेला वाहनचालक ही जाळी चुकवतात. मात्र, वाहतूक वाहती असते तेव्हा हा पर्याय राहात नाही. पीएमपी बससारखी वाहने अशा खड्ड्यातून आदळल्यावर प्रवाशांच्या आदळ-आपटीची कल्पना करवत नाही, इतके हादरे बसला बसत आहेत. एसएनडीटी महाविद्यालयाबाहेरही अशीच खोलगट जाळी आपले स्वागत करते. नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणारी जाळी आपल्याला आढळते ती शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य इमारतीसमोर. या इमारतीसमोर एक बसस्टॉप आहे. त्याला या खोलगट जाळीचा शेजार आहे. तर, मध्ये मेट्रोच्या कामासाठी लोखंडी अडथळे लावले आहेत. त्यामुळे हा रस्ता निमुळता झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशाच जाळ्या आहेत. परिणामी सिमला ऑफिस कार्यालयाकडून जंगली महाराज रस्त्याकडे जाणारे आणि संचेती हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वाहनचालकांना या बंपिंग राईडचा सामना करतच जावे लागत आहे.

नाना पेठेतील ज्येष्ठ नागरिक नीळकंठ मांढरे म्हणाले, मी दुचाकी आणि बस असा दोन्हीने प्रवास करतो. शहरात अनेक ठिकाणी पावसाळी गटारांच्या लोखंडी जाळ्या आतील बाजूस वक्र झाल्या आहेत. त्यातून दुचाकी गेल्यास वाहनचालकाचा तोल जातो. तर, मागे बसलेला माणूस रस्त्यावर पडतो की काय अशी अवस्था होते. तर, पीएमपी बसमध्ये मागील बाजूस बसणारा प्रवासी अक्षरशः जागेवरून वर फेकला जातो. टपाला डोके आदळायचेच बाकी असते. ही साधी वाटत असलेली गोष्ट वाहनचालकांसाठी मात्र प्रचंड त्रासदायक ठरत आहे.

कोथरूड येथील रहिवासी लक्ष्मण चव्हाण म्हणाले, मेट्रो मार्गावरच नव्हे तर कोथरूड परिसरात अशा अनेक जाळ्या आहेत. त्यामुळे वाहन त्यात आदळते. आशीष गार्डनजवळील अशाच एका जाळीची तक्रार क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पंधरा दिवसांपूर्वी केली होती. त्यांनी थोडी डागडुजी केली. मात्र, त्याची दुरवस्था झाली आहे. मेट्रो साकारताना अत्युच्च दर्जाचे इंजिनिअरिंग वापरले गेल्याचे सांगितले जाते. मात्र, आम्हाला अजून पावसाळी गटाराची झाकणे अत्युच्च दर्जाची करता येत नाहीत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story