सट्टा बाजारात तेजी

मटका बुकिंगमध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी कमळ चिन्हाला कमी भाव मिळत असून, गेल्या चार दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल मटका बाजारात झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 1 Mar 2023
  • 01:41 am
सट्टा बाजारात तेजी

सट्टा बाजारात तेजी

महाविकास आघाडी, अपक्ष उमेदवारांचा 'भाव' वधारला; चार दिवसांत कोट्यवधींची उलाढाल

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

मटका बुकिंगमध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी कमळ चिन्हाला कमी भाव मिळत असून, गेल्या चार दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल  मटका बाजारात झाली आहे.

'फेव्हर' भाजपला असल्याचे दोन्ही मतदारसंघात दिसून येत आहे. मात्र, कसब्यात पंजा तेजीत असल्याचे आणि चिंचवडमध्ये घड्याळ जोरात चालले असल्याचे नागरिक सांगतात. परंतु, सट्टाबाजारात मूड काही तरी वेगळाच असल्याचे दिसत आहे. प्रचारात कोणत्या पक्षाचा जोर आहे येथून सुरू झालेला सट्टा सध्या मतदान कुठे कोणाला जास्त झाले आणि निकाल कसा राहील यावरून सट्टा लावण्यात येत आहे. त्यासाठी सट्टेबाज आणि बुकीदेखील सक्रिय झाले आहेत.

चिंचवड मतदारसंघात भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली. सट्टा बाजारातदेखील याच तिघांची चलती राहिली आहे. सुरुवातीला भाजप उमेदवारावर रुपयाला २८ पैसे, महाविकास आघाडी उमेदवारावर रुपयाला २ रुपये आणि अपक्ष बंडखोर उमेदवारावर रुपयाला दीड रुपया हा सुरुवातीचा भाव होता. त्यानंतर महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवाराचा भाव वधारत जाऊन रुपयाला ४, नंतर थेट ७ रुपये एवढा झाला. जिंकणाऱ्या उमेदवाराचा सट्टा बाजारात भाव कमी कमी होत जातो. सध्या चिंचवडमधील भाजप उमेदवाराचा भाव २८ वरून कमी होत होत १२ पैशांवर येऊन थांबला आहे. तीनही उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. सर्वच पक्षांनी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने कसबा तसेच चिंचवड मतदारसंघातदेखील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभा, बैठका झाल्या आहेत. स्टार प्रचारकांच्या रॅलीमुळे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. यावर मतदारांप्रमाणेच सट्टेबाजांचेही लक्ष आहे. गेल्या आठ दिवसांपासून चिंचवड मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनीही शहराचा दौरा केला. या नेत्यांच्या सभेला किती गर्दी होईल यावरदेखील सट्टा लावला गेला.

प्रचार शिगेला पोहचत गेला तसा सट्टाबाजांकडून भाव कमी-जास्त केला गेला आहे. प्रत्येक सभा, बैठक, रॅली, कोपरा सभा यावर सट्टेबाजांचे लक्ष होते. कोणत्या सभेला किती प्रतिसाद मिळतो, यानुसार संबंधित उमेदवाराचा सट्टाबाजारातील ‘भाव’ बदल झाला. ज्या उमेदवाराची विजयी होण्याची शक्यता आहे याचा अंदाज घेऊन त्याच्यावरचा भाव कमी होत गेला आहे. निकाल जाहीर व्हायला अद्याप २४ तास बाकी आहेत. मात्र, सट्टेबाजांकडून सर्वाधिक पसंती चिंचवडमध्ये भाजपला दिली गेली आहे. मात्र, कोरोना काळात सट्टा बाजाराचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भावात चढ-उतार केला जात असल्याचे निरीक्षण यातील काही नेहमीच्या "खेळी" लोकांकडून नोंदवले जात आहे.

प्रचारादरम्यान सुरू झालेला हा सट्टा बाजार मत मोजणीच्या दिवशी देखील तेजीत असणार आहे. मत मोजणीच्या पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत देखील यात विजयी उमेदवारासाठी मोठा सट्टा लावला जाणार असल्याचे सध्याच्या या बाजारातील तेजीवरून दिसत आहे. चिंचवड मतदारसंघातील तिरंगी लढतीमुळे सट्टाबाजारात देखील विजयी उमेदवाराच्या अंदाजाबाबत अनिश्चितता असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. परंतु, उमेदवारांचा सट्टेबाजारातील भाव बदलत गेल्याने सट्टेबाजांचीही चांदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कसबा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत रंगली आहे. या मतदारसंघात देखील उमेदवारांचा सट्टेबाजारातील पसंती क्रम सातत्याने बदलत गेला असून, भाजपला ३५ पैसे तर काँग्रेस उमेदवारावर ४२ आणि नोटासाठी २२ पैसे भाव रंगला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story