एमबीबीएससाठी लाखोंची लाच; 'डीन' पकडला रंगेहाथ
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कॅप राउंडअंतर्गत एमबीबीएस प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना अधिष्ठाता (डीन) डॉ. आशिष श्रीनाथ बनगिनवारला (वय ५४) अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महानगरपालिका आणि एकूणच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात डॉ. बनगिनवारला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती. तक्रारदार यांचा मुलगा नीट - २०२३ उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती.
निवड यादीच्या आधारे तक्रारदार यांनी मुलाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बनगिनवारची भेट घेतली होती, तेव्हा दर वर्षाची शासनाने निश्चित केलेली फी बावीस लाख पन्नास हजार रुपये या व्यतिरिक्त प्रवेशासाठी सोळा लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी १६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे केली होती. त्यानंतर एसीबीने तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, डॉ. बनगिनवारने प्रवेशासाठी तडजोडीअंती १६ लाख रुपये लाचेची मागणी करून, त्यापैकी १० लाख रुपयांचा पहिला हप्ता मागत तो स्वत:च्या कार्यालयात स्वीकारल्यावर एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.