पक्ष, संघटना फोडणे हाच भाजपचा अजेंडा
#पुणे
कोणताही पक्ष, संघटना फोडणे हा केंद्र तसेच राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपचा अधिकृत कार्यक्रमच झाला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मंगळवारी (दि. ८) पुण्यात केली.
राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबाबत भाजपने हेच केले होते, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. स्वाभिमानीचे विदर्भातील नेते रविकांत तुपकर यांनी अलीकडे राजू शेट्टी यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती, त्यांच्या या बंडखोरीमागे भाजपच असल्याचा संशयदेखील राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘तुपकरांसंदर्भात ज्या अर्थी भाजपमधून इतक्या झटपट प्रतिक्रिया येते, ती ऐकून यामागे हाच पक्ष असल्याचा संशय घ्यायला जागा आहे.’’
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे पक्ष संघटना सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाविषयी आणि कार्यपद्धतीबद्दल काही आक्षेप घेतले होते. राजू शेट्टी यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले, मात्र त्यांनी त्याविरुद्ध काहीही केले नाही असा आरोप तुपकर यांनी केला आहे. तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीपुढे आपले म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ ची वेळ दिली होती. मात्र तुपकर यांनी या समितीसमोर येणे टाळले. तुपकर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असून याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘‘शेतकरी माझा आत्मा आहे. कपोलकल्पित बातम्या माझ्याबद्दल पसरवण्यात येत आहेत. या अफवा आता थांबवायला हव्यात.’’
रविकांत तुपकर स्वाभिमानीत राहणार की वेगळा पर्याय निवडणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
feedback@civicmirror.in