विजेचा धक्का लागून मुलगा भाजला, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
सीविक मिरर ब्यूरो
विद्युत प्रवाह सुरू असलेल्या वाहिनीचा शॉक लागून १२ वर्षांचा मुलगा गंभीररित्या भाजला आहे. उच्चदाब विद्युत वाहिनी अंडरग्राऊंड करण्याच्या मागणीकडे लक्ष न दिल्याने मुलाच्या कुटुंबीयांनी तक्रारीनंतर पोलिसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविला आहे.
तळवडेतील रुपीनगर येथे नुकतीच ही घटना घडली. अतुल महादेव बेळे (वय ४१) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महावितरणच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपीनगर परिसरातून महावितरणच्या उच्चदाब वाहिन्या गेल्या आहेत. त्याचा परिसरातील नागरिकांना धोका होण्याची दाट शक्यता असल्याने बेळे आणि त्यांच्या परिसरात राहणाऱ्या इतर लोकांनी महावितरणच्या कार्यालयात सुरुवातीला भेटून तोंडी तक्रार केली होती. त्यानंतर संबंधितांनी अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली होती. या निवेदनाद्वारे नागरिकांनी उच्चदाब वाहिन्या अंडरग्राउंड टाकण्याबाबत मागणी केली होती. मात्र महावितरणकडून या मागणीवर गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.
दरम्यान, १६ एप्रिलला बेळे यांचा १२ वर्षीय मुलगा पतंग खेळत असताना त्याचा पतंग उच्चदाब वाहिनीवर अडकला. तो पतंग काढत असताना मुलाला शॉक बसून त्याच्या अंगावरील सर्व कपडे जळाले आणि तो गंभीर जखमी झाला. सध्या या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वारंवार मागणी करूनही विद्युत वाहिन्या अंडरग्राउंड न टाकल्याने तसेच पोलवरही वायर उघडीच असल्याने मोठा स्पार्क होऊन मुलगा गंभीररित्या भाजल्याने त्याच्यावर प्रथम उपचार करून, कुटुंबाने आसपासच्या नागरिकांसह पोलिसांकडे जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि महावितरणच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर निष्काळजी केल्याबाबत गुन्हा दाखल केला. चिखली पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.