पुणेकरांचे महावितरणवर चेकचे ‘बाऊन्स’र

आधीच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले महावितरण आता अधिक खोलात जाणार असेच काहीसे चित्र आहे. महावितरणच्या पुणे परिमंडळामध्ये लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेले धनादेश विविध कारणास्तव बाऊन्स होत असल्याचे दिसून येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Wed, 12 Jul 2023
  • 12:24 am
पुणेकरांचे महावितरणवर चेकचे ‘बाऊन्स’र

पुणेकरांचे महावितरणवर चेकचे ‘बाऊन्स’र

चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीच्या नावांमुळे एका महिन्यात ६,५०० ग्राहकांचे धनादेश बाऊन्स

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

आधीच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले महावितरण आता अधिक खोलात जाणार असेच काहीसे चित्र आहे. महावितरणच्या पुणे परिमंडळामध्ये लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेले धनादेश विविध कारणास्तव बाऊन्स होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या महिनाभरातच महावितरणला बिलाच्या रकमेपोटी दिलेले तब्बल ६,५०० ग्राहकांचे धनादेश वटले गेले नाहीत. यामुळे या ग्राहकांना सुमारे ४८ लाख ७५ हजारांच्या बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेसचा तसेच १.२५ टक्के विलंब आकाराचा भुर्दंड सोसावा लागला. असे असूनही शासकीय तिजोरीत मात्र काहीच जमा झाले नाही. या प्रकारामुळे वैतागलेल्या महावितरणवर ‘‘ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’ किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सीस्टिमद्वारे (ईसीएस)  करावा,’’ असे आवाहन करण्याची वेळ आली आहे.  

पुणे परिमंडळाअंतर्गत सुमारे ९८ हजार ५०० ते ९९ हजार वीजग्राहक दरमहा धनादेशाद्वारे सुमारे ११९ कोटी ५० लाख रुपयांचा वीजबिल भरणा करीत आहेत. यातील सुमारे ६,००० ते ६,५०० ग्राहकांनी दिलेले साधारणतः ४ कोटी ६५ लाख रुपयांचे धनादेश विविध कारणांमुळे बाऊन्स होत आहेत. यामध्ये पुणे शहरातील ४,४५०, पिंपरी-चिंचवडमधील १,०५० तर मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड आणि मावळ तालुक्यातील सुमारे एक हजार ग्राहकांचे धनादेश दरमहा बाऊन्स होत असल्याचे दिसून आले.

धनादेश बाऊन्स होण्यामागे चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, संबंधित खात्यात रक्कम नसणे आदी कारणे दिसून येत आहेत. अनादरीत धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम व विलंब आकार लावण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक वीजबिलासाठी ७५० रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस आणि १.२५ टक्के विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

याउलट पुणे परिमंडलामध्ये राज्यात सर्वाधिक दरमहा २० लाख लघुदाब ग्राहकांकडून तब्बल ६०० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा ‘ऑनलाइन’द्वारे केला जात आहे. तसेच थेट बँकेद्वारे दरमहा वीजबिल भरणा करण्यासाठी ‘ईसीएस’ची सोय उपलब्ध आहे.

पुणे परिमंडळाचे  मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितले की, लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे वीजबिल भरण्याची मर्यादा यापूर्वी १० हजार रुपयांपेक्षा अधिक होती. ही मर्यादा आता किमान ५ हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार या ग्राहकांच्या ५ हजारांपेक्षा अधिक रुपयांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशीलदेखील देण्यात येत आहे.’’

घरबसल्या एका क्लिकवर ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासाठी ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर लगेच भरणा केल्यास १ टक्के असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड वगळता ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरणा पद्धतीस आरबीआय बँकेच्या पेमेंट आणि सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतुदी लागू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी वीजबिलांचा धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story