पुण्यात ‘राष्ट्रवादी भवन’वर दोन्ही गटांचा दावा
विजय चव्हाण
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बंड करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात राज्यातील अनेक ठिकाणी कार्यालयाच्या मालकीवरून वाद सुरू झाले आहेत. पुण्यातील प्रशस्त आणि भव्यदिव्य अशा राष्ट्रवादी भवनवर मंगळवारी (दि. ४) दोन्ही गटांनी आपला दावा ठोकला.
मुंबई आणि नाशिकमध्ये पक्ष कार्यालयावरून वाद झाल्याची घटना घडल्यानंतर दिल्लीतही राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. दिल्लीतल्या कार्यालयातून प्रफुल्ल पटेलांचा फोटो हटवल्यानंतर सोमवारी पटेल गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दिल्लीतील कार्यालयावर प्रफुल्ल पटेल यांच्या गटाने दावा केला. मात्र आपण या कार्यालयातून हटणार नाही, असा दावा पक्षाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सोनिया दुहान यांनी केला. हा वाद मिटवण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. या घटनेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया यांच्याकडे पक्षाच्या दिल्ली कार्यालयाची जबाबदारी सोपवली. दरम्यान, अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे शहरातही आता पक्ष कार्यालयाच्या मालकीवरून सुरू झालेल्या वादाचे लोण पसरले आहे.
शहर कार्यालय उभारणीत अजित पवार यांनी मोठी भूमिका निभावल्यानंतर आता महापालिका भवनशेजारील डेंगळे पुलाजवळील भव्य इमारतीतील 'राष्ट्रवादी भवन' हे मध्यवर्ती कार्यालय कोणाचे, हा वाद रंगला आहे. शहरातील बहुतांश नगरसेवक, आमदार अजित पवारांच्या बाजूने असल्याने साहजिकच पक्ष कार्यालय त्या गटाकडे जाईल, असा होरा आहे. संभाव्य वाद टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी कार्यालयाभोवती बंदोबस्त वाढवला आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर, पुण्याच्या पूर्व भागातील राष्ट्रवादीचे एक माजी नगरसेवक म्हणाले, ‘‘इथे संपूर्ण पक्षच अजित पवार यांच्या बाजूने असल्याने पक्षाच्या सर्व शाखा, कार्यालये आणि मालमत्ता यावर त्यांच्या गटाचे पक्षाध्यक्ष आणि कार्यकारिणीचे नियंत्रण असेल. पुण्यातील कार्यालयही याला अपवाद नाही. येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट झाल्यानंतर कार्यालयाचा अधिकृत ताबा घेण्यात येईल.’’
मात्र, शरद पवार यांचे निष्ठावंत असलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी (दि. ४) नवी माहिती समोर आणल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भविष्यात अजित पवार गटाने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा ताबा मागितल्यास तुमची भूमिका काय राहणार, या प्रश्नावर प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाबत संबंधित व्यक्तीसोबत जो करार झाला आहे, त्यावर प्रशांत सुदामराव जगताप असा उल्लेख आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे भविष्यात कोणी ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याचा अधिकार मला आहे. त्यामुळे अजित पवार यांचा गट पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा ताबाच घेऊ
शकत नाही.’’
पुण्यातील टिळक रोडवरच्या २०० स्क्वेअर फुटाच्या गिरे बंगल्यातून चालणारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार ६,००० स्क्वेअर फुटांच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयातून गेले वर्षभर सुरू आहे. या कार्यालयात भव्य सभागृहे, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा , हॉटलाइन्स तर आहेतच शिवाय पक्षाचा इतिहास सांगणारे विविध कक्ष, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी ग्रंथालय, सोशल मीडिया सेल आदी बाबीही आहेत.
दुसरीकडे वेगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे समर्थक आमदार, पदाधिकारी, त्यांचे कार्यालय आणि निवासस्थान परिसरातही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश दिले. ‘‘राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यालयांच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,’’ असे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.