मित्राशी जपले रक्ताचे नाते....

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यापासून सर्वपक्षीय मैत्री जपणारा नेता म्हणून गिरीश बापट यांनी आपली ओळख शहरात निर्माण केली होती. राजकारणातून निवृत्त झालेले जुने मित्र असो की नव्याने झालेले मित्र असोत, त्यांनी मैत्रीत कधी फरक केला नाही. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाशेजारी असलेल्या आचार्य आनंदऋषीजी ब्लड बॅंकेला ते दरमहा २५ हजारांपासून काही हजारांत रक्कम पाठवत. गेली दहा वर्षे त्यांनी हा शिरस्ता पाळला असल्याचे माजी महापौर आणि ब्लड बँकेच्या शांतीलाल सुरतवाला यांनी सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 30 Mar 2023
  • 11:04 am
मित्राशी जपले रक्ताचे नाते....

मित्राशी जपले रक्ताचे नाते....

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यापासून सर्वपक्षीय मैत्री जपणारा नेता म्हणून गिरीश बापट यांनी आपली ओळख शहरात निर्माण केली होती. राजकारणातून निवृत्त झालेले जुने मित्र असो की नव्याने झालेले मित्र असोत,  त्यांनी मैत्रीत कधी फरक केला नाही. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाशेजारी असलेल्या आचार्य आनंदऋषीजी ब्लड बॅंकेला ते दरमहा २५ हजारांपासून काही हजारांत रक्कम पाठवत. गेली दहा वर्षे त्यांनी हा शिरस्ता पाळला असल्याचे माजी महापौर आणि ब्लड बँकेच्या शांतीलाल सुरतवाला यांनी सांगितले.

शांतीलाल सुरतवाला हे १९९० च्या दशकातील शहराच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी नंतर सक्रिय राजकारणातून सन्यास घेतला. मात्र, महापालिकेत काम करत असताना बापट यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. राजकारणातील निवृत्तीनंतरही त्यांच्या या मैत्रीत दुरावा निर्माण झाला नाही. त्यावेळी बरोबर काम करणारे बापट आमदार, मंत्री आणि खासदार झाले. त्यानंतरही त्यांनी मैत्रीचे संबंध जपले असल्याचे सुरतवाला यांनी 'सीविक मिरर'ला सांगितले.

ते म्हणाले, १९८३ साली आमची मैत्री झाली. त्यानंतर राजकीय जीवनात ते वरच्या पायऱ्या चढत गेले. मंत्री आणि खासदार झाले. तरीही आमच्या मैत्रीत अंतर पडले नाही. मी तर राजकीय जीवनातून संन्यास घेतला होता. त्यांनी तसे अंतर कधी पडू दिले नाही. सत्ता नसतानाही ते महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. आज एक टर्म स्थायी समिती मिळाल्यानंतर ऐश्वर्य संपन्न झालेले अनेक नेते आपण पाहतो. मात्र, बापट हे स्थायी समितीचा कार्यकाल संपल्यानंतर स्कूटरवरून घरी गेले. अशी माणसे विरळाच असतात.

आनंदऋषीजी ब्लड सेंटरचे मी काम पाहतो. एक मित्र म्हणून त्यांनी माझ्या संस्थेला लाखो रुपयांची मदत केली. आमदार-खासदार म्हणून त्यांना तीन लाखांवर वेतन असेल. मात्र, ते त्यातील किती पैसे घरी नेत असतील, याबाबत मला शंकाच आहे. कारण माझ्याच संस्थेला ते दरमहा २५ हजार रुपये देत. तर कधी दोन तीन महिन्यांनी एक-दोन लाख रुपये द्यायचे. ओंकारेश्वरसह दहा-पंधरा संस्थांना ते नियमित आर्थिक मदत करीत असल्याचे मला माहित आहे. माझ्या संस्थेलाही मदत देताना ते सार्वजनिक वाच्यता करू नको, असे सांगायचे, अशी आठवण सुरतवाला यांनी सांगितली.

महापालिकेतील `गॅस` त्रिकूट

महापालिकेत काम करत असताना गिरीश बापट, अंकुश काकडे आणि शांतीलाल सुरतवाला यांचे त्रिकूट शहरात प्रसिद्ध होते. वेगवेगळ्या पक्षांचे असूनही तिघांची मैत्री शहरात चर्चेचा विषय ठरली होती. त्यांच्या या त्रिकूटाला गॅस (जीएएस) म्हणून ओळखले जायचे. प्रत्येकाच्या नावाचे अद्याक्षर घेऊन हा शब्द रूढ झाला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story