राष्ट्रवादीच्या बंडाने पिंपरी-चिंचवडमधील भाजप सैरभैर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडाने शहर भाजप सैरभैर झाल्याचे चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. अजित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये आल्यावर महापालिका काबीज केलेल्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, आता निवडणुकीला सामोरे जाताना कोणत्या तोंडाने मते मागायची, असा सवाल कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात नेत्यांना विचारला जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Tue, 4 Jul 2023
  • 06:25 am
राष्ट्रवादीच्या बंडाने पिंपरी-चिंचवडमधील भाजप सैरभैर

राष्ट्रवादीच्या बंडाने पिंपरी-चिंचवडमधील भाजप सैरभैर

पालिकेत राष्ट्रवादीला अंगावर घेतलेल्या नेत्यांना पडले कोडे, निवडणुकीत मते कशी मागायची, प्रश्नाने हैराण

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडाने शहर भाजप सैरभैर झाल्याचे चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. अजित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये आल्यावर महापालिका काबीज केलेल्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, आता निवडणुकीला सामोरे जाताना कोणत्या तोंडाने मते मागायची, असा सवाल कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात नेत्यांना विचारला जात आहे.

माजी आमदार लांडे यांचा अपवाद वगळता माजी महापौर संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर आदी नेत्यांनी यांनी रविवारी संध्याकाळी अजित पवार यांची भेट घेत 'आम्ही तुमच्या बरोबर' असल्याचे सांगितले.

माजी आमदार विलास लांडे यांच्या देव्हाऱ्यात शरद पवार यांचा फोटो आहे. पवार साहेब माझे दैवत आहेत, असे म्हणत लांडे यांनी कायम साहेबांबरोबर राहणार असल्याचे सांगितले आहे, पण राष्ट्रवादीमधील अन्य अनेक पदाधिकाऱ्यांनी आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला असून, वारे कुठे वळते त्यानुसार भूमिका बदलणार असल्याचे बोलले जात आहे. पदावर नसलेले अनेकजण आम्ही शरद पवारसाहेबांबरोबर असल्याचे सांगत आहेत. परंतु, घरातील मुलाबाळांना नगरसेवक करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांनी आतल्या दाराने अजित पवार यांच्याशी सलगी कायम ठेवली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील नेते रिॲक्टीव्ह झाल्याने भाजप पदाधिकारी सैरभैर झाले आहेत. पक्ष बघू नका आपल्या नेत्याने आतापर्यंत सगळी कामे केली आहेत. प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे राज्यात आणि शहरात भविष्यात काही बदल झाले तरी त्याचा आपल्या कामांवर परिणाम होणार नाही, असा विश्वास देण्याचा प्रयत्न सोशल मीडियाद्वारे होताना दिसत आहे.

भाजपचे महत्त्वाचे प्रकल्प म्हणून गणले जाणारे जॅकवेल, भूमिगत फायबर ऑप्टिकल केबल, मशिनद्वारे रस्ते सफाई, मालमत्ता जीओ सर्व्हेक्षण आदींना राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता या प्रकल्पांना विरोध कायम राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भाजपने काबीज केल्यानंतर स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीला थेट अंगावर घेण्याचे काम केले. महापालिकेत केवळ आपला प्रभाव असायला हवा, यासाठीच गेली पाच वर्षे या नेत्यांनी प्रयत्न केले. वेळप्रसंगी थेट अजित पवार यांच्यावरही जाहीररीत्या टीका केली. महापालिकेत बस्तान बसवत अनेक टेंडर मागच्या दाराने या नेत्यांनी मिळवली. त्यातून शेकडो कोटीची गणिते पूर्ण केली. मात्र, आता जर अजित पवारच भाजपचे सहकारी झाले आहेत, तर पिंपरी-चिंचवडवर सद्दी कोणाची, एवढे वर्ष केलेल्या प्रयत्नाने काय साध्य होणार, आपले कष्ट वायाला जाणार का, असा प्रश्न भाजपच्या स्थानिक नेत्यांना पडला आहे. तसेच काही नेत्यांना पडलेली मंत्रिपदाची स्वप्नेही या घटनेने धूसर झाली आहेत. त्यामुळे सध्या शहरातील भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story