भाजपचा 'हनिमून मोड', तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची धरसोड

भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. परंतु भाजपने मिशन २०२४ मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 9 Jun 2023
  • 12:49 am

भाजपचा 'हनिमून मोड', तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची धरसोड

भाजपची पुणे शहरातील मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर, मविआत अजूनही धरसोड

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. परंतु भाजपने मिशन २०२४  मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांची यादी गुरुवारी  जाहीर केली. यामध्ये पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे.

महाविकास आघाडीतर्फे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणे सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई, पुणे येथे बैठका झालेल्या आहेत. आगामी काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांची एकत्रित बैठक होऊन जागावाटप यावर चर्चा होणार आहे.

२०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपची शिंदे गटासोबत युती असणार आहे. त्यांची अद्याप चर्चा सुरू झाली नसली तरी भाजपने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ आणि २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांची यादी आज जाहीर करून निवडणुकीची जबाबदारी निश्चित केली आहे.

गेल्याच आठवड्यात प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे यांची पुणे लोकसभेचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर आज मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुख निश्चित करताना तेथील माजी आमदार किंवा निवडणूक लढवलेले उमेदवार निवडले आहेत.  

हडपसरचे प्रभारी सचिन मोरे म्हणाले, ' वडगाव शेरी मतदारसंघाची जबाबदारी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शिवाजीनगर दत्ता खाडे, कसबा मतदारसंघ हेमंत रासने, कोथरूड पुनीत जोशी, हडपसर माजी आमदार योगेश टिळेकर, हडपसर सचिन मोरे, पर्वती जितेंद्र पोळेकर, पुणे कॅन्टोन्मेंट अजिंक्य वाळेकर यांची नियुक्ती केली आहे."- दरम्यान, पुणे  लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधला कलगीतुरा रंगला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अत्यक्षपणे या जागेवर आपला दावा केला आहे, तर काँग्रेसचे नाना पटोले ही जागा सोडण्याच्या तयारीत नाही.

विरोधी पक्षनेते अजित पवार पुण्यात म्हणाले की, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. राज्यात कोणतीही पोटनिवडणूक लागली तर मतदारसंघात ज्या पक्षाची जास्त जागा आहे, त्याला ती जागा मिळावी, अशी इच्छा असल्याचं वक्तव्य करत अजित पवार यांनी पुण्याच्या जागेवर दावा ठोकला होता  त्यामुळे आता पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत सुप्त संघर्ष सुरू होण्याची चिन्हं आहेत. पुण्याची जागा ही काँग्रेसकडे आहे, त्यामुळे ती आम्हीच लढणार, अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  घेतली आहे.

Share this story