BJP : भाजप करतेय बेरीज, राष्ट्रवादीत शह-काटशह

भारतीय जनता पक्षाने शहर जिल्हाध्यक्षांची निवड बुधवारी जाहीर केली असून, पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी शंकर जगताप यांची तर पुणे शहरच्या अध्यक्षपदी धीरज घाटे यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, भाजप निवड-नियुक्तीच्या माध्यमातून बेरजेचे राजकारण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे शहर जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवण्याच्या घडामोडी घडत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Wed, 19 Jul 2023
  • 11:24 pm
भाजप करतेय बेरीज, राष्ट्रवादीत शह-काटशह

भाजप करतेय बेरीज, राष्ट्रवादीत शह-काटशह

पिंपरी-चिंचवडच्या भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप, अजित पवार गटाने दिली बरखास्त पदाधिकाऱ्यांना त्याच पदावर नियुक्ती

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

भारतीय जनता पक्षाने शहर जिल्हाध्यक्षांची निवड बुधवारी जाहीर केली असून, पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी शंकर जगताप यांची तर पुणे शहरच्या अध्यक्षपदी धीरज घाटे यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, भाजप निवड-नियुक्तीच्या माध्यमातून बेरजेचे राजकारण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे शहर जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवण्याच्या घडामोडी घडत आहेत.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू, माजी नगरसेवक आणि सध्या भाजप प्रदेश कार्यकारिणीत निमंत्रित सदस्य अशी शंकर जगताप यांची ओळख आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर शंकर जगताप हेच भाजपकडून उमेदवार असतील असे गृहित धरले जात असतानाच, आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा कुटुंबातील एका सदस्याला पक्षाने उमेदवारी दिल्याने आम्ही पक्षाचे आभारी आहोत, असे जगताप कुटुंबीयांकडून सांगितले गेले होते, तर विरोधकांकडून जगताप कुटुंबात फूट पडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येण्यापूर्वी शहराध्यक्षपद हे माजी नगरसेवक एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे होते. त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आल्यावर महापालिकेची २०१७ ची निवडणूक झाली होती. ज्यामध्ये भाजपची शहरात एकहाती सत्ता आली. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आले होते. त्यांच्या कालावधीत चिंचवडची पोटनिवडणूक झाली. त्यानंतर भाजपमधील अनेकजण शहराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. आमदार लक्ष्मण जगताप यांना शहराध्यक्ष केल्यानंतर भाजपचा जुना आणि नवीन असे दोन गट पडले होते. पण आमदार जगताप यांनी सर्वांना एकत्रित करून महापालिकेत एकहाती सत्ता आणली, पण त्यांच्या निधनानंतर पुन्हा भाजपमध्ये दुफळी माजण्याची चिन्हे आहेत.

शंकर जगताप यांना शहराध्यक्ष केल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीतील सदस्य अमोल थोरात यांनी स्वपक्षावर घराणेशाहीचा आरोप केला आहे. आमदारकी दिल्यानंतर पुन्हा जगताप कुटुंबीयांना झुकते माप देत शहराध्यक्षपद का दिले, असा सवाल थोरात यांच्याकडून केला जात आहे, तर भाजपमधील काही माजी नगरसेवक हे शहराध्यक्षपद मिळावे म्हणून प्रयत्नशिल होते. पक्षाने महापालिकेच्या आगामी निवडणुकांची रणनीती आणि २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शंकर जगताप यांना शहराध्यपद दिल्याचे पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्य सरकारमधील राजकीय उलथापालथीनंतर आता आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उत्साह वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने नवे शहर व जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करून संघटनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांचे समर्थक शह-काट-शहच्या राजकारणात गुंतले आहेत. दिवसेंदिवस दोन्ही गट एकमेकांचे समर्थक काढण्यात व्यस्त आहेत. शरद पवार गटाने १४ जिल्हे आणि शहरांमधील २१ अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बरखास्त केल्या आहेत.

प्रदेश पातळीवरील नियुक्त्यानंतर शहर-जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांना ब्रेक लागला होता. अखेर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील नूतन पक्षाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रथमच पुणे ग्रामीण भागासाठी दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामती आणि मावळ अशा दोन गटांमध्ये ग्रामीण भागाची विभागणी करण्यात आली असून, नव्या नियुक्त्यांनुसार माजी नगरसेवक धीरज घाटे यांची भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी, तर माजी नगरसेवक शंकर जगताप यांची पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

पुणे ग्रामीणसाठी वासुदेव काळे यांची बारामती विभागासाठी, तर शरद बुट्टे पाटील यांची मावळ विभागासाठी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपमध्ये नवीन नियुक्त्या दिसून येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर बरखास्तीचा काळ सुरू झाला आहे. 

राष्ट्रवादी फुटल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील पक्ष संघटना आणि माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. दुसरीकडे, तरुण आणि विद्यार्थी संघटनांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची घोषणा केली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहुल भोसले, जगदीश शेट्टी, प्रवक्ते फजल शेख यांचा समावेश आहे. दरम्यान, शरद पवार गटाने पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते, देवेंद्र तायडे, प्रशांत सपकाळ, काशिनाथ जगताप, मयूर जाधव, राजन नायर, शीला भोंडवे यांचा समावेश आहे.

या उपर अजित पवार गटाने पिंपरी-चिंचवडमधील बरखास्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना त्याच पदावर नियुक्ती दिली आहे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सत्तेत झालेला समावेश आणि भाजपच्या शहर-जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरून महापालिकेच्या निवडणुकांचे वारे लवकरच वाहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story