शहरात भाजप, जिल्ह्यात राष्ट्रवादी
विजय चव्हाण
आगामी विधानसभा निवडणुकीत शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ९ तर त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी भागात भारतीय जनता पक्ष आघाडी मारेल असा अंदाज असला तरी ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. या अंदाजानुसार निकाल लागले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. 'न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात वरील अंदाज नोंदविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा, तर भारतीय जनता पक्षाला पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची जागा गमवावी लागेल, असा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड जैसे थे
सध्याच्या स्थितीत केलेल्या सर्वेक्षणानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला १२५ जागा मिळतील, असा अंदाज न्यू एरेना इंडिया या संस्थेने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदारसंघात काय परिस्थिती राहील, याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. भाजपकडून काँग्रेसने खेचून घेतलेला कसबा विधानसभा मतदारसंघ भाजप पुन्हा राखेल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा जिल्ह्यात दबदबा आहे. मात्र शहरासह जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक नऊ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा मिळतील, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसच सवाधिक जागा जिंकणारा पक्ष असेल, असे न्यूज एरेना इंडिया या संस्थेच्या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, बारामती आणि मावळ या जागा राष्ट्रवादी कायम राखणार असल्याचे दाखविण्यात आलेले आहे. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दुसरीकडे मावळमध्ये भाजपला पुन्हा धक्का बसेल, असा अंदाजही नोंदविण्यात आला आहे.
ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस सहा जागा जिंकणार असला, तरी भाजपला दौंड आणि इंदापूर मतदारसंघातील जागा मिळतील. पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम राहील, तर चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांत भाजपला यश मिळेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील कसबा, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपकडे जातील तर शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ भाजपला गमवावे लागण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. हडपसर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, न्यूज एरिना इंडिया'च्या पाहणीनुसार, महाराष्ट्रात आज विधानसभेची निवडणूक झाली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अवघ्या २५ जागा मिळतील. राज्यातील ३५ टक्के जनतेचा मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.