जन्मदात्या बापाचा नात्याला काळिमा
#कोथरूड
वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने जन्मदात्या वडिलांनी १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर वडील दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते. हे मुलीला पटले नाही, त्यामुळे मुलीने वडिलांना दुसऱ्या लग्नासाठी विरोध केला होता. त्यानंतर वडिलांनीच तिचा विनयभंग केला असल्याचे समोर आले आहे.
शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख लवकरच गुन्हेगारीचे शहर म्हणून व्हायला लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे शहरात आणि परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येत आहेत. अशात कर्वेनगरमध्ये जन्मदात्या पित्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १३ वर्षीय मुलीने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही मुलगी कर्वेनगरमध्ये राहते. या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार अल्पवयीन मुलीचे वडील आणि आजीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून आजपर्यंत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर वडिलांना दुसरे लग्न करायचे होते. मात्र मुलीने त्यास विरोध दर्शवला. या विरोधामुळे अल्पवयीन मुलीचे वडील संतापले होते. त्यानंतर त्यांनी स्वत:च्याच लेकीला शिवीगाळ केली. घरात वावरत असताना तिला त्रास दिला. एकटी असताना पाहून मुलीच्या गुप्तांगाला हात लावून विनयभंग केला. तसेच आजीनेही त्या मुलीला मानसिक त्रास दिला. मुलगी आजीला विनाकारण मारहाण करते म्हणत तिची बदनामी केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.