Pune police : पुणे पोलिसांनी गाजावाजा करत सुरू केलेली सायकल गस्त योजना गायब

एक वेगळा उपक्रम म्हणून शहरात मोठा गाजावाजा करत पोलिसांनी सायकल गस्त घालण्यास सुरुवात केली होती. कोणत्याही नव्या उपक्रमात सातत्य नसेल तर नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे उपक्रम बासनात गुंडाळला जातो. सायकल गस्त या योजनेचेही असेच झाले असून उपक्रम सुरू करणारे अधिकारी बदलताच योजना बंद पडली आहे. शहरातील पोलिसांची सायकल गस्त थंडावली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 25 Apr 2023
  • 05:25 am
गस्तीची सायकल पंक्चर!

गस्तीची सायकल पंक्चर!

पुणे पोलिसांनी गाजावाजा करत सुरू केलेली सायकल गस्त योजना सध्या गायब आहे, गस्तीच्या सायकली आता पोलीस स्टेशनच्या आवारात धूळ खात पडलेल्या आहेत

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

एक वेगळा उपक्रम म्हणून शहरात मोठा गाजावाजा करत पोलिसांनी सायकल गस्त घालण्यास सुरुवात केली होती. कोणत्याही नव्या उपक्रमात सातत्य नसेल तर नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे उपक्रम बासनात गुंडाळला जातो. सायकल गस्त या योजनेचेही असेच झाले असून उपक्रम सुरू करणारे अधिकारी बदलताच योजना बंद पडली आहे. शहरातील पोलिसांची सायकल गस्त थंडावली आहे.

गस्तीसाठी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये सायकल देण्यात आल्या होत्या. अधिकारी, पोलिसांचे फोटो सायकल समवेत सगळीकडे झळकले होते. सध्या मात्र सायकल गस्त कोठ दिसत नाही. पोलिसांना दिलेल्या सायकली आता धूळ खात पडून आहेत. बरेच दिवस एकाच जागेवर पडून असलेल्या सायकलींवर आता गंज चढत आहे. काही पोलीस ठाण्यात गस्तीसाठीच्या सायकली दिसत नाहीत. सायकल गस्त बंद पडल्याने आता शहरात पोलिसांची पायी गस्त सुरू झाली आहे. नवी विटी नवे राज्य या प्रमाणे नव्या अधिकाऱ्यांनी चालू केलेल्या नावीन्यपूर्ण योजना संबंधित अधिकारी बदलून गेल्यावर अडगळीत पडतात.

कधी काळी पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. शहरात सर्वत्र सायकलींचा वापर होत असे. राज्यातही बऱ्याच ठिकाणी सायकलचा वापर व्हायचा. पोलीस गस्त घालण्यासाठी सायकलचा वापर करायचे. इंधनाचा वापर टाळून पर्यावरण रक्षण आणि शारीरिक व्यायाम होऊन आरोग्य तंदुरुस्त राहावे हा सायकल गस्तीमागचा उद्देश होता. या योजनेमुळे पोलिसांचा सामान्य जनतेशी संपर्क आणि संवादही वाढला होता. त्यामुळे नागरिकांच्यात सुरक्षेची भावना वाढीला लागली होती. याचबरोबर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सायकलचा उपयोग करा हा संदेश नागरिकांमध्ये पोहोचला होता. अरुंद रस्ते, गर्दीच्या ठिकाणी गल्लीबोळातून गस्त घालण्यासाठी पोलिसांना सायकलचा उपयोग होत असे. गस्त घालताना लोकांचे जवळून निरीक्षण करता येते. त्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. सायकलमुळे पेट्रोलवर खर्चही होणार नाही आणि पोलिसांचे आरोग्य चांगले राहील या हेतूने ही योजना शहरात राबवण्याचा निर्णय घेतला होता. योजना सुरू झाल्यावर मोठ्या उत्साहाने पोलीसही  गस्त घालत असलेले पाहावयास मिळत होते. मात्र हा उत्साह आता मावळलेला दिसतोय.

पुणे महापालिका आयुक्त, पोलीस सहआयुक्त यांच्या हस्ते समर्थ पोलीस ठाण्यातील पोलिसांना अत्याधुनिक फँटम कंपनीच्या सायकल पेट्रोलिंगसाठी भेट दिल्या होत्या. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काही ठिकाणी अरुंद रस्ते आणि गल्लीबोळ आहेत. त्यामुळे गस्तीच्या वेळी पोलिसांना वाहनांच्या वापरावर मर्यादा येत. सायकल गस्तीमुळे अनेक उद्देश साध्य होऊन जनतेमध्ये निश्चित चांगला संदेश जाईल, असे त्यावेळच्या पोलीस सहआयुक्तांनी सांगितले होते. या उपक्रमाचे फोटोही वेबसाईटवर अपलोड झाले. सायकलींबाबत जनजागृती आवश्‍यक असल्याने आम्ही सायकली घेतल्या. त्यातून आम्ही पर्यावरण रक्षणाचेही महत्त्व पटवून देत निरोगी आरोग्याचाही संदेश देत असल्याचे या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

नुकत्याच निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याशी मिररने संवाद साधला. त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, "मी  पुण्यात असताना सायकल पेट्रोलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी नियमित सकाळ-संध्याकाळ सायकलवरून गस्त घालण्यात येत होती. सायकल गस्तीमागचा उद्देश साध्य झाला आणि त्यामुळे काही सकारात्मक बदल घडून आला. मी निवृत्त झाल्यावर तेथे दुसरे अधिकारी आले. त्यांचा प्राधान्यक्रम आणि उद्देश योजनेशी मिळता-जुळता नसल्याने गस्तीच्या सायकली अडगळीत पडलेल्या आहेत". 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story