बिबट सफारीचा ‘प्रवास’ बारामतीहून जुन्नरला
विजय चव्हाण
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होणार असल्याचे जाहीर केल्याने राजकीय श्रेयवादात अडकलेल्या बिबट सफारीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी हा प्रकल्प बारामतीत होणार होता.
बिबट सफारी जुन्नरमध्ये नाही तर बारामतीत होणार, अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. बिबट सफारी जुन्नरमध्ये होणार की बारामतीत होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता बिबट सफारी जुन्नरमध्येच होणार असल्याचे फडणवीसांनी जाहीर केल्याने याबाबतची संदिग्धता संपुष्टात आली आहे.
अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडीखेल या ठिकाणी १०० हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसेच या उपक्रमासाठी सुमारे ६० कोटी रुपयांची तरतूद केली होती. दुसरीकडे, राज्यात सत्ताबदल झाल्यावर बिबट सफारी जुन्नरमध्येच व्हावी, या मागणीने जोर धरला. जुन्नरच्या पर्यटन वाढीसाठी सफारीसाठी ८० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करून हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना २२ फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या पत्रात अनेकांनी केली होती.
अजित पवारांच्या निर्णयाचा राष्ट्रवादीचेच आमदार अतुल बेनके यांनी विरोध केला होता. पुणे पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर जुन्नरला बिबट सफारीचा प्रकल्प जाहीर झाला होता, पण कालांतराने तो प्रकल्प बारामतीला जात असल्याचे वन खात्याकडून जाहीर करण्यात आले. मात्र या निर्णयाला बेनकेंनी विरोध केला होता आणि जुन्नरमध्ये बिबट सफारी करण्याची त्यांनी मागणी केली होती.
जुन्नर वनविभागाने बिबट सफारीची जागा निश्चित करण्यासाठी मागील वर्षी मार्चमध्ये नऊ सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने प्राथमिक स्तरावर पाच जागांचे सर्वेक्षण केले होते. यातील आंबेगव्हाण आणि कुरण ही दोन स्थळे अनुकूल असल्याचे अहवालात नमूद केले होते. जिओ इंजिनिअर्स संस्थेने कुरण आणि खानापूर परिसरात ६ मे २२ रोजी सर्वेक्षण केले होते. या अहवालात आंबेगव्हाणपेक्षा कुरणच्या स्थळास पर्यटनस्थळे जवळ असल्याने आणि येथे खर्च कमी येणार असल्याने अनुकूलता दर्शवली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ सप्टेंबर २२ रोजी वन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुरणऐवजी आंबेगव्हाण येथील बिबट सफारीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वनविभागाने आंबेगव्हाण येथील बिबट सफारीचा फेरप्रस्ताव पाठवला होता. आंबेगव्हाण येथील बिबट सफारीस कुरणच्या तुलनेत २५ टक्के जास्तीचा खर्च आणि कालावधी लागणार असल्याचे प्रस्तावात म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या िनदेर्शांनुसार ही सफारी आंबेगव्हाण येथे होणार आहे.