‘वंचित’ कलाटेंच्या मागे, फायदा भाजपला?
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनाने जाहीर होत असलेल्या चिंचवड, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची स्टार प्रचारकांची फौज रिंगणात उतरणार आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजप विरोधी जी मते महाविकास आघाडीला मिळणार होती ती कलाटे यांना मिळाल्यास याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होईल असे बोलले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रचाराची आघाडी सांभाळणार आहेत. भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी दिग्गज मंडळी प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी होतील.
राष्ट्रवादीकडून २० जण प्रचारात
चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना २० स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य, ग्रामीण आणि शहर पातळीवरील नेत्यांना निवडणूक प्रचारात सहभागी केले आहे. स्टार प्रचारकांमध्ये पवार यांच्यासह माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, आमदार नीलेश लंके, आमदार अमोल मिटकरी, सुभान अली शेख यांचा समावेश आहे.
भाजपचे ४० जण प्रचारक
भाजपच्या केंद्रीय समितीने तब्बल चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचाही समावेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. त्यात निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा चाळीसजणांचा यादीत समावेश आहे.
चिंचवडमध्ये वंचितची ३५ हजार मते
महापालिका निवडणुका येत्या सहा महिन्यात होण्याची शक्यता असून, पोटनिवडणुकीत कोण बाजी मारतो यावर महापालिकेचे गणित ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीची हक्काची चिंचवड विधानसभा मतदारसंघात पस्तीस हजार मते असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना ही मते मिळाली असती. आता वंचितने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजप उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना होणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
वंचित कलाटेंच्या मागे
वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी याबाबत प्रसिध्दिपत्रक दिले आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हीडीओ कॉन्फन्सद्वारे) बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे . काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा असे विनंती पत्र आलेले नाही. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात निर्णय घेतलेला नसल्याचे ठाकूर यांनी कळविले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.