व्हा सिद्धहस्त, आणू वाहतुकीला शिस्त !

कल्पना करा, आपण वेळेबाबत खूप काटेकोर आहोत, शिस्तबद्ध आहोत हे आपल्या बॉसला दाखवून खुश करण्यासाठी तुम्ही भल्या सकाळी साडेआठ वाजता ऑफिसच्या दिशेने कूच केली आहे. निघण्यापूर्वी तुम्ही गुगल मॅप बघता तेव्हा विद्यापीठ रस्ता लाल रंगाने भरलेला दिसतो आणि तेथे तुम्हाला कोंडीमुळे वीस मिनिटे अधिक लागणार असतात. मात्र, विमाननगर मधील कार्यालयात वेळेपूर्वी पोहचण्याच्या निर्धारामुळे तुम्ही यू टर्न घेता आणि खडकीच्या दिशेने वळता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 25 Mar 2023
  • 01:50 pm
व्हा सिद्धहस्त, आणू वाहतुकीला शिस्त !

व्हा सिद्धहस्त, आणू वाहतुकीला शिस्त !

‘सीविक मिरर’, ‘ पुणे टाइम्स मिरर’ आणि वाहतूक पोलिसांचा ‘जरा देख के चलो ’ हा उपक्रम २७ मार्चपासून शहरभर राबवला जाणार आहे. या कालावधीत पुणेकर वाहतुकीची धुरा हाती घेतील. यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे

अमृता प्रसाद / अर्चना मोरे

feedback@civicmirror.in

कल्पना करा, आपण वेळेबाबत खूप काटेकोर आहोत, शिस्तबद्ध आहोत हे आपल्या बॉसला दाखवून खुश करण्यासाठी तुम्ही भल्या सकाळी साडेआठ वाजता ऑफिसच्या दिशेने कूच केली आहे. निघण्यापूर्वी तुम्ही गुगल मॅप बघता तेव्हा विद्यापीठ रस्ता लाल रंगाने भरलेला दिसतो आणि तेथे तुम्हाला कोंडीमुळे वीस मिनिटे अधिक लागणार असतात. मात्र, विमाननगर मधील कार्यालयात वेळेपूर्वी पोहचण्याच्या निर्धारामुळे तुम्ही यू टर्न घेता आणि खडकीच्या दिशेने वळता. मात्र, आजचा दिवस काही तुमचा सुदैवी दिवस नसतो. खडकीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची अफाट गर्दी आहे, सतत वाजणाऱ्या हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणाने कमाल पातळी गाठलेली आहे. साहजिकच ऑफिसमध्ये तुम्ही दाखल होता ते तब्बल ४५ मिनिटे विलंबाने. बॉसचा चेहरा रागाने लालबुंद झालेला, तुम्ही लेटलतीफ झाल्याने त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला गुगल मॅपवरील वाहतूक विलंबाच्या रेषा, चौका चौकातील सिग्नलवरील स्टॉपच्या खुणा स्पष्टपणे दिसत असतात. अर्थात तुम्ही पुणेकर असाल तर हे दृश्य किंवा चित्र तुमच्यासाठी रोजचेच म्हणावे लागेल. तुम्हाला भेटलेल्या पुणेकरांतील प्रत्येक दुसरा नागरिक आपण याच अनुभवातून गेल्याचे किंवा जात असल्याचे सांगेल. 

 गेल्या काही वर्षांत पुण्यातील वाहतुकीची अवस्था वाईटातून अत्यंत खराब स्थितीकडे जात असून आता तर ती सहन करण्याच्या पलीकडे पोहोचली आहे. वाहतूक कोंडीचा दररोज होणारा उद्रेक कमी की काय म्हणून टॉम टॉम ट्रॅफिक रँकिंग इंडेक्स २०२२ ने त्यावर वरताण केली आहे. त्यांनी ५६ देशांतील ३८९ शहरातील वाहतूक स्थितीचा अभ्यास केला असता सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरात पुण्याने चक्क सहावा क्रमांक मिळवला. 

या नको असलेल्या मानाच्या क्रमांकाने तुमच्या-आमच्या सारखे सामान्य पुणेकर, प्रशासन आणि पुणे शहर वाहतूक पोलीस खात्याला धोक्याचा इशारा दिलेला आहे.  

वाहतुकीची समस्या आणि रस्त्यावरील कोंडीवर मात करण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.  सामान्य नागरिकांनी वाहतूक नियम, सुरक्षेचे पालन करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ पुणे टाइम्स मिरर’ , ‘सीविक मिरर’ आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांनी एक आगळा-वेगळा उपक्रम आयोजित केला आहे. याचे नाव ‘जरा देख के चलो ’ असे असून हा उपक्रम रस्ता सुरक्षा आणि त्याबाबत नागरिकांमध्ये जाणिवेचे वातावरण तयार होण्याच्या उद्देशाने आखलेला आहे.  मदतीचे एक पाऊल पुढे टाकून शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या कामी वाहतूक पोलिसांना मदतीचा अल्पसा हात द्यावा असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सामान्य पुणेकरांना करत आहोत. शहरातील वर्दळ असलेल्या तीस ठिकाणी/ सिग्नलवर हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याकामी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आहे. मदतीच्या या छोट्या पावलानेही शहरातील तीस सिग्नलवरील वाहतूक सुलभ आणि सुरळीत होण्यामध्ये सामान्य नागरिकांचा हातभार लागू शकतो.

‘जरा देख के चलो ’ या उपक्रमाला पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह-आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अन्य वरिष्ठ आणि वाहतूक पोलिसांचा पूर्ण पाठिंबा लाभलेला आहे. याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, वाहतुकीचा विचार केला तर शहर म्हणून पुण्यासमोर अनेक आव्हाने आहेत. सर्वाधिक दुचाकी आणि चार चाकी वाहने असलेल्या देशांतील मोजक्या शहरांत पुण्याचा समावेश होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न आपणाला भेडसावत आहे. या आव्हानाला पोलिसांना सामोरे जावयाचे आहे. मात्र, या कामात वाहतूक पोलिसांना समाजाने, नागरिकांनी मदतीचा हात दिला तर हे आव्हान पेलण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागाने आणि पाठिंब्याने वाहतूक सुलभ आणि सुरक्षित होऊ शकेल. ‘ पुणे टाइम्स मिरर’ , ‘सीविक मिरर’ आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांचा ‘जरा देख के चलो ’ हा वेगळा उपक्रम असून त्यातील नागरिकांच्या मदतीने बदल घडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन मदतीचा हात पुढे करावा असे पुणेकरांना आमचे विनम्र आवाहन आहे.

‘जरा देख के चलो ’ या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या ‘ पुणे टाइम्स मिरर’ , ‘सीविक मिरर’ चे कौतुक करताना पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विजय मगर  म्हणाले की, वाहनांच्या कोंडीमुळे पुणेकरांना वाहतुकीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. ‘ पुणे टाइम्स मिरर’ , ‘सीविक मिरर’ आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या ‘जरा देख के चलो ’ या उपक्रमामुळे स्थितीमध्ये निश्चित बदल होऊ शकतो. सुरक्षित वाहतूक आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी सामान्य नागरिकांनी या उपक्रमात अवश्य सहभागी व्हावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर बरेच प्रश्न सुटू शकतात. अशा कामात पुणेकरांनी वाहतूक पोलिसांना मदतीचा अल्पसा हात पुढे केला तर स्थितीत फरक पडू शकतो. यामुळे विद्यार्थी, सामाजिक संघटना, आयटियन्स, स्वयंसेवी संस्था आदींनी पुढे येऊन ‘जरा देख के चलो ’ उपक्रमात सहभागी व्हावे आणि सामाजिक उत्तरदायित्व निभवावे. यातील सहभागाच्या अनुभवामुळे त्यांच्यात सुरक्षित आणि शिस्तबद्ध, नियमबद्ध वाहतुकीची जाणीव निर्माण होईल. 

या अनुभवातून हेच पुणेकर पुढे इतरांना चार अनुभवाचे बोल सांगतील आणि वाहतूक नियम कसे आवश्यक आहेत याबाबत प्रशिक्षित करतील. सामाजिक सहभागामुळे आपण वाहतूक कोंडीवर काहीअंशी मात करण्यात यशस्वी होऊ, हे नक्की.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story