बस थांब्यांवरील खासगी वाहनांना दंड

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसथांब्यालगत थांबणाऱ्या रिक्षा तसेच इतर खासगी वाहनांमुळे प्रवाशांसह बसचालकांना त्रास होत आहे. ही वाहने अडथळा ठरत असल्याने अनेक ठिकाणी बस रस्त्याच्या मधोमध किंवा स्थानकापासून लांब उभ्या राहतात. त्यामुळे प्रवाशांनाही बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेत पीएमपीने आता दक्षता पथके स्थापन केली असून त्यामध्ये वाहतूक पोलिसांचाही समावेश केला जाणार आहे. या पथकांकडून सध्या मोठ्या बसस्थानकांच्या परिसरात खासगी वाहनांना बसस्थानकांजवळ थांबण्यास अटकाव केला जात आहे, तर लवकरच पोलिसांमार्फत थेट दंडात्मक कारवाईही सुरू केली जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Editor User
  • Wed, 18 Jan 2023
  • 04:27 pm

बस थांब्यावर खासगी वाहनांना अटकाव करताना पीएमपीचे कर्मचारी.

पीएमपीने दक्षता पथकांची केली स्थापना, वाहतूक पोलिसांचाही समावेश

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसथांब्यालगत थांबणाऱ्या रिक्षा तसेच इतर खासगी वाहनांमुळे प्रवाशांसह बसचालकांना त्रास होत आहे. ही वाहने अडथळा ठरत असल्याने अनेक ठिकाणी बस रस्त्याच्या मधोमध किंवा स्थानकापासून लांब उभ्या राहतात. त्यामुळे प्रवाशांनाही बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेत पीएमपीने आता दक्षता पथके स्थापन केली असून त्यामध्ये वाहतूक पोलिसांचाही समावेश केला जाणार आहे. या पथकांकडून सध्या मोठ्या बसस्थानकांच्या परिसरात खासगी वाहनांना बसस्थानकांजवळ थांबण्यास अटकाव केला जात आहे, तर लवकरच पोलिसांमार्फत थेट दंडात्मक कारवाईही सुरू केली जाणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीचे अडीच ते तीन हजार बसथांबे आहेत. जवळपास सगळ्याच थांब्यांना अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे. त्याचा फटका पीएमपीसह प्रवाशांनाही बसत आहे. अनेक बसथांब्यांसमोर किंवा बाजूला रिक्षा, दुचाकी चालक थांबलेले असतात. याशिवाय फळे, भाजीपाला विक्रेते बस थांब्यांची जागा अडवतात. त्यामुळे पीएमपी चालकांना  थांब्यालगत बस नेताना अडचणी येतात. प्रवाशांनाही बस नीटपणे दिसत नाही. त्यामुळे तेही थांबा सोडून रस्त्यावर पुढे येऊन उभे राहतात. चालकाला थांब्याजवळ बस नेण्यासाठी जागाच मिळत नसल्याने मग नाईलाजास्तव बस रस्त्याच्या मध्येच किंवा थांब्यापासून लांब उभी करावी लागते. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांनाही अडथळा निर्माण होतो.

वर्दळीच्या रस्त्यावर ही बाब प्रकर्षाने जाणवते. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येतात. त्यावेळी पीएमपी बसचालकाला दोष दिला जातो, पण प्रत्यक्षात बस थांब्यालगत नेण्यासाठी चालकाला जागाच नसते. त्यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो, असे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पीएमपी प्रशासनाने बसथांब्यावर बस बे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव दोन्ही महापालिकांना पाठवला आहे. बस बेमध्ये चालकाने बस उभी करणे आवश्यक आहे, तर या बसबे लगत विक्रेते किंवा इतर वाहने उभी राहू नयेत, ही अपेक्षा आहे. अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्याआधीच आता पीएमपीने दोन दक्षता पथकांची नेमणूक केली आहे.

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या संकल्पनेतून दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे. याविषयी वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले, पीएमपीच्या बसथांब्यांजवळ किंवा समोर विक्रेत्यांच्या गाड्या तसेच रिक्षा व इतर वाहने असल्याने बसला थांबायला जागा नसते. त्यामुळे बस रस्त्याच्या मध्येच उभी करावी लागते. त्यामुळे शहरी भागात वाहतूक कोंडी होते. तसेच प्रवाशांना प्रामुख्याने अपंग, महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे आता हे अडथळे दूर करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे दोन दक्षता पथके कार्यरत करण्यात आली आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. प्रत्येक पथकामध्ये चार कर्मचारी आहेत. ही पथके सर्व मार्गांवर फिरती राहतील, थांब्यालगत वाहने किंवा विक्रेते दिसल्यास त्यांना तिथून दूर केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

 

मागील आठवड्यात या पथकांचे काम सुरू झाले असून दररोज १५ ते २० बसथांब्यांवर जाऊन पाहणी केली जात आहे. जिथे अडथळा दिसेल तिथे थांबून वाहने बाजूला घेण्यास सांगितले जात आहे. तसेच, इतर वाहनचालकांना न थांबण्याचे आवाहनही करत आहोत. या पथकांमध्ये वाहतूक पोलिसांचाही समावेश केला जाणार आहे. तसे पत्रही दिले आहे. लवकरच या पथकामध्ये पोलीसही दिसतील. त्यानंतर प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईला सुरुवात होईल.

- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story