'ब्रम्हा' त विनाश लिला

ब्रम्हा म्हणजे साऱ्या विश्वाचा निर्माता. साऱ्या विश्वातील पशू-पक्ष्यांची त्याने निर्मिती केल्याने त्याला ब्रम्हांडाचा नायक किंवा विश्वविधाता म्हणतात. त्याचे नाव सार्थ करणारी एक सोसायटी वडगाव शेरीत असून ती ब्रम्हा सनसिटी या नावाने ओळखली जाते. आता ही सोसायटी नागरिकांसाठी आहे की श्वानांसाठी आहे,

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Feb 2023
  • 12:41 pm
'ब्रम्हा' त विनाश लिला

'ब्रम्हा' त विनाश लिला

आधीच त्रस्त असलेल्या ब्रम्हा सनसिटीत भटक्या श्वानांच्या हल्ल्यात मुलगा अत्यवस्थ

गुणवंती परस्ते / अली शेख 

feedback@civicmirror.in

ब्रम्हा म्हणजे साऱ्या विश्वाचा निर्माता. साऱ्या विश्वातील पशू-पक्ष्यांची त्याने निर्मिती केल्याने त्याला ब्रम्हांडाचा नायक किंवा विश्वविधाता म्हणतात. त्याचे नाव सार्थ करणारी एक सोसायटी वडगाव शेरीत असून ती ब्रम्हा सनसिटी या नावाने ओळखली जाते. आता ही सोसायटी नागरिकांसाठी आहे की श्वानांसाठी आहे, असा प्रश्न पडावा अशी घटना तेथे घडली असून सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या एका सहा वर्षांच्या मुलावर सहा-सात श्वानांनी क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा रक्तबंबाळ झाला असून त्याच्यावर ससूनमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याला आणले तेव्हा त्याची स्थिती गंभीर होती, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. मात्र, या घटनेने सोसायटीमध्ये प्रामुख्याने मुलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या सोसायटीच्या परिसरात ७० ते ८० श्वान असून त्यांनी हल्ला करण्याची ही काही पहिली घटना नाही. आता या कथेतील दुसरा भाग असा आहे की, सोसायटीतच राहणाऱ्या प्राणिप्रेमींचा श्वानांवर कारवाई करण्यास सक्त विरोध असून त्यांनी पुणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना परत पाठवले आहे.    

सोसायटीत असणाऱ्या भटक्या श्वानांमुळे अन्य रहिवासी हैराण झाले आहेत. मंगळवारच्या घटनेत या श्वानांनी पाठलाग करून मुलावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या मुलाचे नाव अनिरुद्ध जोंधळे ( वय सहा) असे असून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो खेळत असताना सहा-सात श्वानांनी त्याच्यावर हल्ला चढविला. रक्ताळलेल्या अवस्थेत अनिरुद्ध सैरावैरा धावत असताना काही जणांचे त्याच्याकडे लक्ष गेले. बाल्कनीतून धावत आलेल्या रहिवाशांनी या हिंस्त्र श्वानांपासून त्याला कसेबसे वाचवले. या हल्ल्यात अनिरुद्धच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या असून रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने ससूनकडे पळवण्यात आले. अनिरुद्धचे आजोबा सोसायटीत हाऊस किपर आहेत, तर त्याची आई मंजूषा याच भागात घरकाम करते. 

जखमी झालेल्या रक्तबंबाळ अनिरुद्धला पाहून त्याच्या आईने तर हंबरडा फोडला. त्याचे आजोबा चांगलेच घाबरलेले होते. त्यांच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हता. 

अशा घटनांबाबत सोसायटीच्या सदस्यांनी अनेक वेळा पालिकेकडे तक्रार केली असली तरी अशा घटनांना ते प्राणिप्रेमींना जबाबदार धरतात. त्यांच्या मतांनुसार तक्रारीनंतर पालिकेचे कर्मचारी श्वानांना घेऊन जाण्यास आले तेव्हा कारवाई रोखण्यास प्राणिप्रेमींनी मोठी आघाडी उघडली. बरं असे प्रकार सोसायटीत अनेक वेळा झाले आहेत. प्राणिप्रेमींच्या टोकाच्या भूमिकेमुळे आपणाला दहशतीच्या वातावरणात जगावे लागते असे अनेकजण उघडपणे बोलतात. आजच्या घटनेनंतर सोसायटीतील १०० हून अधिक रहिवासी प्राणिप्रेमींविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते.     

या सोसायटीत राहणारी आणि घटना प्रत्यक्ष पाहणारी परमजीत कौर आजच्या घटनेबाबत म्हणाली की, आमच्या बाल्कनीत उभी असताना मुलाचा जोराने ओरडण्याचा आवाज ऐकला. एखादा मुलगा खेळताना पडला असावा आणि त्यामुळे जखमी झाला असावा असे प्रथम वाटले. मात्र, जेव्हा पाहिले तेव्हा पाठलाग करणाऱ्या श्वानापासून वाचण्यासाठी अनिरुद्ध रक्तबंबाळ अवस्थेत सैरावैरा धावत असल्याचे दिसले. ते पाहून जोराने ओरडले तेव्हा काहीजण मदतीसाठी धावून आले. कसेबसे आम्ही अनिरुद्धला हिंस्त्र श्वानापासून वाचवले. 

सोसायटीतच राहणारा रोशन गर्ग याबाबत म्हणाला की, श्वानांनी मुलांवर हल्ला करण्याची सोसायटीतील ही पहिली घटना नाही. दोन महिन्यांपूर्वी याच भटक्या श्वानांनी माझ्या मुलांवर हल्ला केला होता. माझ्या एक वर्षाच्या मुलाबरोबर सोसायटीच्या आवारात फिरत असताना आजची घटना घडली. काहीजण सैरावैरा धावत असताना आवारात ओरडाओरड सुरू होती. मी तातडीने घरी जाऊन बाळाला घरी ठेवले आणि घटनास्थळी धाव घेतली. अनिरुद्धला अनेक ठिकाणी श्वानांनी चावे घेतल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. त्याला तातडीने ससूनकडे पळवण्यात आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे मी तक्रार केली आणि या श्वानांना हलवण्याची जोरदार मागणी केली. मात्र, सोसायटीतील प्राणिप्रेमींनी त्याला विरोध तर केला. शिवाय माझ्याविरुद्धच त्यांनी पोलिसांत तक्रार केली.    

सोसायटीतील आणखी एक रहिवासी सीमा म्हणाली की, या भटक्या श्वानांविरुद्ध कारवाई करण्यास प्राणिप्रेमी तीव्र विरोध करत असल्याने रहिवासी आता त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. सोसायटीतील प्राणिप्रेमी पालिका अधिकाऱ्यांना या श्वानांविरुद्ध कारवाई करू देत नाहीत आणि मुलाबाळांना सोसायटीत सुखाने जगू देत नाहीत. ७०-८० च्या संख्येने असलेल्या या श्नानांचा आम्हा सर्वाना खूप त्रास होतो, त्यांचे वास्तव्य खूप अडचणीचे, गैरसोयीचे आहे. आजच्या घटनेला हे प्राणिप्रेमीच जबाबदार असल्याने पोलिसांना त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास आम्ही त्यांना भाग पाडणार आहोत.  

रहिवाशांच्या मतानुसार सोसायटीत साधारण दहाच्या आसपास प्राणिप्रेमी असून ते इतरांचा विरोध असला तरी नियमितपणे या श्वानांना खायला घालत असतात. पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या श्नानांचे निर्बिजीकरण करण्यास प्राणिप्रेमींनी सतत विरोध केला असून त्यांनी आम्हाला कारवाई करण्यास प्रतिबंध केला आहे. प्राणी कल्याणासाठी केलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार आम्ही जबरदस्तीने सोसायटीत प्रवेश करून श्वानांचे निर्बिजीकरण करू शकत नाही. कायद्याने आमचे हात बांधलेले आहेत. 

 या सोसायटीचा पसारा ब्रम्हा नाव सार्थ करेल असाच आहे. ४२ एकरच्या भव्य जागेवर सोसायटी पसरलेली असून तेथे असलेल्या ४६० फ्लॅटमध्ये १५०० पेक्षा अधिक लोक राहतात. आता प्रश्न असा आहे की ब्रम्हाच्या नावाने ओळखली जाणारी ही सोसायटी रहिवाशांसाठी आहे की श्वानांसाठी. आता या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही, हे खरे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story