बोगीत डॉगी

कुत्रा, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची रेल्वेतून ने-आण करण्यासाठी विशिष्ट नियम आहेत. त्यानुसारच त्यांच्यासाठी स्वतंत्र बुकिंग करून प्रवास करावा लागतो, पण दोन दिवसांपूर्वी एका कुत्र्याने पुणे ते नांदेडदरम्यान जवळपास साडेतेरा तास अन्य प्रवाशांसोबत वातानुकूलित डब्यातून ऐटीत प्रवास केला. इतर प्रवाशांनी या बाबत गाडीतील तिकीट तपासनिसांकडे (टीसी) तक्रार केली. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचा संपूर्ण प्रवास धाकधुकीतच गेल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Editor User
  • Wed, 25 Jan 2023
  • 04:28 pm

Dog

पुणे-नांदेड एक्स्प्रेसमध्ये पाळीव कुत्र्यासोबत प्रवाशांचा १३ तास दहशतीत प्रवास; टीसीचे दुर्लक्ष

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

कुत्रा, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची रेल्वेतून ने-आण करण्यासाठी विशिष्ट नियम आहेत. त्यानुसारच त्यांच्यासाठी स्वतंत्र बुकिंग करून प्रवास करावा लागतो, पण दोन दिवसांपूर्वी एका कुत्र्याने पुणे ते नांदेडदरम्यान जवळपास साडेतेरा तास अन्य प्रवाशांसोबत वातानुकूलित डब्यातून ऐटीत प्रवास केला. इतर प्रवाशांनी या बाबत गाडीतील तिकीट तपासनिसांकडे (टीसी) तक्रार केली. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचा संपूर्ण प्रवास धाकधुकीतच गेल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला.Pune-Nanded Express

 

रेल्वेमधून पाळीव प्राण्यांची वाहतूक करण्याचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढले आहे. त्यामध्ये सर्वाधिक पसंती कुत्र्यांना दिली जाते, पण हा प्रवास करताना त्यांच्यासाठी नियमावली करण्यात आली असून प्रवास भाडेही स्वतंत्र आकारले जाते. त्यांना सामान म्हणूनच ग्राह्य धरले जाते. त्यांचे वजन व प्रवासाच्या अंतरानुसार हे दर निश्चित केलेले असतात. तसेच त्यांना प्रवासासाठी रेल्वेगाडीच्या गार्ड केबिनमध्ये स्वतंत्र पिंजरा असतो. त्यामध्ये या प्राण्यांना बंदिस्त ठेवले जाते. त्यांच्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. त्यानुसार प्रथम श्रेणीच्या सामान्य किंवा वातानुकूलित डब्यातूनही त्यांची ने-आण करता येते, त्यासाठी डब्ब्यात दोन किंवा चार आसनांची बाजू पूर्णपणे आरक्षित करावी लागते. त्यानंतर या डब्यांमधून पाळीव प्राण्यांसह मालकाला प्रवास करता येतो.

पुण्यातून सध्या दररोज चार ते पाच पाळीव प्राण्यांची ने-आण होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. अनेकदा बुकिंग न करताच प्राण्यांची वाहतूक केली जात असून त्यावर कारवाईही होत नसल्याचे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेवरून समोर आले आहे. वीस जानेवारी रोजी पुणे ते नांदेड एक्स्प्रेसमध्ये एका कुत्र्याला संबंधित मालकाने थेट तृतीय श्रेणी एसी डब्यामधून प्रवास घडवला. या डब्यातून प्राण्यांची ने-आण करण्यास परवानगी नाही, पण त्यानंतरही संबंधित प्रवासी इतर प्रवाशांसोबत कुत्र्याला घेऊन प्रवास करत होता.

काही प्रवाशांनी यावर आक्षेप घेत कुत्र्याला अन्यत्र नेण्याची विनंती संबंधित मालकाला केली. त्यानेही याबाबत सकारात्मकता दर्शविली होती, पण त्यानंतरही काहीच घडले नाही. त्यामुळे या प्रवाशांनी गाडीतील तिकीट तपासनिसांकडेही याबाबत तक्रार केली. त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे देत दुर्लक्ष केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. संबंधित टीसीने प्रवाशाला कुत्र्यासह गाडीतून खाली उतरवणे अपेक्षित होते. किंवा त्या कुत्र्याची इतरत्र व्यवस्था करायला हवी होती. तसे काहीच न झाल्याने संपूर्ण प्रवास या कुत्र्याने इतर प्रवाशांसोबतच केला. नाव न छापण्याच्या अटीवर एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, मी माझ्या लहान मुलासह नांदेड  एक्स्प्रेसने प्रवास करत होतो. माझ्या आसनाशेजारच्या आसनावरच कुत्रा व संबंधित प्रवासी होता. कुत्रा फारसा ओरडत नव्हता, पण साहजिकच लहान मुलगा व इतर प्रवासी घाबरले होते. त्याची हालचाल झाली, इकडे-तिकडे नेले की मुलगा घाबरत होता. त्यामुळे आम्ही त्या कुत्र्याला इतरत्र नेण्याची विनंती संबंधित मालकासह टीसीलाही केली. त्यांनी थोड्या वेळात करू असे सांगून विषय टाळला. पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे संपूर्ण प्रवास कुत्र्यासोबतच करावा लागला. याबाबत संबंधित प्रवाशासह टीसीवरही कारवाई करण्याची गरज आहे. संबंधित प्रवाशाला गाडीत चढताना कोणत्याही रेल्वे अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अडविले नाही, याचे आश्चर्य वाटते.

रेल्वेला लाखोंचे उत्पन्न

पुणे विभागातून एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षभरात ५५४ पाळीव प्राण्यांचे बुकिंग झाले होते. त्यातून चार लाख ३९ हजार ५८४ रुपये महसूल मिळाला होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी रेल्वे वाहतुकीला मर्यादा होत्या. त्यामुळे हा आकडा कमी होता. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत हा आकडा १७६३ वर पोहचला. त्यातून रेल्वेने १३ लाख ४४ हजार ५७६ रुपयांची कमाई केली. याचा अर्थ दररोज चार ते पाच पाळीव प्राण्यांची बुकिंग होत आहे. यामध्ये सर्वाधिक प्राणी हे पुणे रेल्वे स्थानकातून जातात. त्यातही कुत्र्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत १३८५ प्राण्यांची वाहतूक पुणे रेल्वे स्थानकावरून झाली.  

पाळीव प्राण्यांना घेऊन केवळ प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यातून विशिष्ट आरक्षणानुसारच नेता येते. इतर डब्यातून नेल्यास त्यांना गाडीतून खाली उतरविणे किंवा नियमानुसार कारवाई करणे आवश्यक असते, पण नांदेड  एक्स्प्रेसमध्ये तसे घडलेले नाही. प्रवाशांच्या तक्रारीची टीसीने दखल घेतलेली दिसत नाही. हे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. चौकशीतून जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story