'बालभारती'चे डोमेन २ हजार डॉलरला !
विजय चव्हाण
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत असणारे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे म्हणजेच बालभारतीचे डोमेन विकणे आहे, अशा स्वरूपाची जाहिरात गूगलवर झळकली आणि अवघ्या काही वेळात शिक्षण विभाग अक्षरश: हादरला. बालभारतीने तातडीने ‘हे नेमकं झालं कसं?’ हे शोधण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज कामाला लावली.
बालभारतीने या संदर्भात तक्रार नोंदवली असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. तसेच, याबाबत तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर नेमके काय झाले आहे, हे उघड होईल, असेही बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई, अभ्यासक्रम संशोधन करणाऱ्या ‘बालभारती’ या राज्य सरकारच्या संस्थेच्या ‘balbharati.in’ या संकेतस्थळाचे डोमेन दोन हजार यूएस डॉलर किमतीला विकणे आहे, अशी जाहिरात गूगलवर प्रसिद्ध झाल्याचे दिसून आले. तर ‘ebalbharti.in’ या संकेतस्थळावर बालभारतीची पाठ्यपुस्तके ‘ई-साहित्य’ स्वरूपात उपलब्ध आहेत. राज्यातील कोट्यवधी विद्यार्थी, लाखो पालक, शिक्षक या संकेतस्थळाला भेट देतात, तसेच या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात विनामूल्य डाऊनलोड करता येतात.
बालभारतीचे ‘balbharati.in’ हे अधिकृत डोमेन असून, ते २००५-०६ या वर्षात घेण्यात आले आहे. तर, या डोमेनच्या नूतनीकरणाची पुढील पाच वर्षांची प्रक्रिया २०२३ मध्ये केली आहे. असे असतानाही कोणी तरी डोमेनबाबत खोडसाळपणा केल्याचे दिसून येत आहे.
'याबाबतचा तांत्रिक अहवाल घेतला असून, त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सुरुवातीला ऑनलाइन स्वरूपात तक्रार नोंदविण्यात येत आहे. नेमका काय प्रकार झाला आहे, याची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सध्या सुरू असून माहिती घेतली जात आहे. रीतसर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करण्यात येणार आहे', अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली. राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, ‘इंटरनेटवर ‘बालभारती’चे अधिकृत डोमेन विकण्याची जाहिरात सध्या दिसत असून, हा फसवणुकीचा प्रकार आहे. याबाबत बालभारतीकडून कार्यवाही करण्यात येत आहे. लवकरच कायदेशीर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्या संदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे.’
बालभारती शालेय पाठ्यपुस्तके तयार करते, छापते आणि त्यांची विक्री करते. बालभारती दरवर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू आणि सिंधी या ८ भाषा माध्यमांतून ९३२ शीर्षकांच्या ९ कोटी पुस्तकांची छपाई करते. पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या बालभारतीच्या ९ विभागीय भांडारांतून पाठ्यपुस्तकांचे वितरण होते. मुंबईच्या कार्यालयातून मुद्रणाचे कामकाज चालते. बालभारतीचे स्वत:चे मुद्रणालय नाही. देशभरातील विविध मुद्रणालयांकडून पाठ्यपुस्तकांची छपाई करून घेतली जाते. पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त मुलांचे आवडते ‘किशोर’ मासिक बालभारतीकडूनच प्रकाशित होते. अतिशय आकर्षक आणि सचित्र इंग्रजी-मराठी शब्दकोश, निवडक बालभारतीचे १४ खंड व इतर अनेक पाठ्येतर पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.