बाबा म्हणतो, मेट्रो दमवणारी !
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
मेट्रो स्टेशनपर्यंतच्या प्रवासाची सुविधा नसल्यामुळे पुणे ते पिंपरी-चिंचवड या शहरांना जोडणारी मेट्रो प्रवाशांच्या गैरसोयीची ठरत आहे. पिंपरी ते रुबी हॉल या दरम्यानचा मेट्रो प्रवास हा अवघ्या २९ मिनिटांचा आहे. मात्र, घर ते मेट्रो स्टेशन हा प्रवास दीड तासांचा होत असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकडमधील नागरिक सचिन लोंढे यांनी मुलीच्या शिक्षणानिमित्त पिंपरी ते रुबी हॉल दरम्यानचा प्रवास करत या मार्गाची पाहणी केली त्यात मेट्रोचा प्रवास २९ मिनिटांचा तर घर ते मेट्रो स्टेशनसाठी ९० मिनिटे लागत असल्याचे समोर आले आहे.
या दोन शहरांना जोडणाऱ्या मेट्रोच्या प्रवासाने नागरिकांचा वेळ आणि पैसे वाचत असले तरीही वाकड, पिंपळे सौदागर, रहाटणी या भागातील नागरिकांना मेट्रो स्टेशनपर्यंत पोहचण्यासाठी वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे त्यांनी मेट्रोकडे पाठ फिरवली आहे. लोंढे यांनी पालक या नात्याने मुलीच्या रोजच्या प्रवासासाठी पिंपरी ते पुणे दरम्यान धावणारी मेट्रो कितपत फायद्याची ठरू शकते, यासाठी हा प्रवास केला, त्यानंतरच त्यांना मेट्रो दमवणारी असल्याचा अनुभव आला आहे.
पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि पालक सचिन लोंढे यांनी रविवारी (६ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजून ३६ मिनिटांनी वाकड येथील घरातून पिंपरी मेट्रो स्टेशनच्या दिशेने प्रवास सुरू केला. परंतु, मेट्रोला आवश्यक असणारी फीडर बस अथवा ऑटो-रिक्षा सेवा प्रशासनाने सुरू केलेली नाही. त्यामुळे त्यांना एकदा रिक्षा तर दोनदा बसने प्रवास करून मेट्रो स्टेशन गाठावे लागले. लोंढे हे वाकड दत्तमंदिर रोडवरून डांगे चौकापर्यंत शेअर रिक्षाने १० रुपये देऊन गेले. त्यानंतर डांगे चौकात १५ मिनिटे वाट बघितल्यानंतर त्यांना चिंचवड गावात जाणारी बस मिळाली. त्यासाठी १० रुपयांचे तिकीट घ्यावे लागले. तेथून काही अंतर चालत गेल्यावर त्यांना पिंपरी मेट्रो स्टेशनला जाणारी बस ८ वाजून ३० मिनिटांनी मिळाली.
त्यासाठी पुन्हा १० रुपयांचे तिकिट घ्यावे लागले. वाकड दत्तमंदिर ते पिंपरी मेट्रो स्टेशन या सव्वा सात किलोमीटरच्या प्रवासाला लोंढे यांना ९० मिनिटे एवढा कालावधी लागला.
८ वाजून ४५ मिनिटांच्या मेट्रोने २१ रुपयांचे तिकीट घेऊन त्यांनी रुबी हॉल पर्यंतचा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांमध्ये पूर्ण केला. यामध्ये १५ मिनिटे ही शिवाजीनगर स्टेशन येथून मेट्रो लाईन चेंज करण्यासाठी गेला. वास्तवात मेट्रोचा प्रवास हा अवघ्या २९ मिनिटांचा होता. दररोज कॉलेज आणि नोकरी-कामधंद्यासाठी जर पिंपरी-चिंचवडमधील झपाट्याने विकसित झालेल्या परिसरातील नागरिकांना मेट्रोचा वापर करायचा झाल्यास तो सोयीचा नसल्याचे आता लोंढे यांनी केलेल्या प्रवासातून दिसून येत आहे. मेट्रोच्या उद्घाटनानंतर पीएमपीएमलची फीडर बस सेवा सुरू करण्यात आली. परंतु, लोंढे यांना मेट्रो गाठण्यासाठी जी यातायात करावी लागली आहे त्या भागात अशी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
कॉलेजसाठी पिंपरी-चिंचवडमधील विविध भागातील विद्यार्थी दररोज पुण्यात जातात. त्याचबरोबर अनेक नोकरदारांना दररोज पुण्यातील विविध भागात प्रवास करावा लागतो. मी देखील माझ्या मुलीसाठी हा प्रवास सोयीस्कर आहे का, हे पाहण्यासाठी वाकड ते पिंपरी मेट्रो स्टेशन ते रुबी हॉल स्टेशन असा प्रवास केला. परंतु, हा प्रवास अत्यंत गैरसोयीचा आणि वेळखाऊ होता. मला वाकड ते पिंपरी-रुबी हॉल पुन्हा पिंपरी ते वाकड या प्रवासासाठी तीन तास ४५ मिनिटे लागली. तसेच मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी ३० रुपये अतिरिक्त खर्च करावे लागले. रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर, रावेत या भागातील नागरिकांसाठी फीडर बस आणि रिक्षा सेवा सुरू करण्याची गरज असल्याची भावना पालक व पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे उपाध्यक्ष सचिन लोंढे यांनी सीविक मिररशी बोलताना व्यक्त केली आहे.
मेट्रोचे तिकिट २१
आणि घर ते मेट्रो ३० रुपये
वाकड, पिंपळे सौदागर, रहाटणी या भागात उच्च शिक्षित आणि नोकरदार वर्ग राहतो. आयटी बरोबरीनेच पुण्यातील अन्य बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांचे वास्तव्य या भागात आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून मेट्रोचा वापर अधिक होऊ शकतो. परंतु, वाकड ते पिंपरी मेट्रो स्टेशन गाठायला ९० मिनिटे लागत असून, याचा खर्च हा मेट्रोच्या तिकिटापेक्षा अधिक म्हणजेच ३० रुपये एवढा आहे. लोंढे यांनी केलेला प्रवास हे याचे बोलके उदाहरण ठरले आहे. पिंपरी-चिंचवडमधून सध्या चार मार्गांवर फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे, तर पुण्यात तीन मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी (मोरवाडी) मेट्रो स्टेशन ते घरकुल (चिखली) हा एक मार्ग; काळेवाडी फाटा ते पिंपरी हा एक मार्ग; नाशिक फाटा स्टेशन ते भोसरी इंद्रायणीनगर हा एक मार्ग आणि दापोडी स्टेशन ते नवी सांगवी-पिंपळे गुरव या मार्गावर सध्या फीडर बस सुरू करण्यात आली आहे.
या मार्गांवर हवी फीडर सेवा
वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर ते नाशिक फाटा स्टेशन तसेच रावेत, डांगे चौक, चिंचवडगाव ते पिंपरी स्टेशन या दोन मार्गांवर फीडर बसची सेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे. पिंपळेसौदागर भागातील स्थानिक माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दोनच दिवसांपूर्वी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले असून, या भागासाठी फीडर बस सुरू करण्याची मागणी केली आहे.