Dehu-Alandi : देहू-आळंदी रस्त्यावर होर्डिंगसाठी झाडांवर कुऱ्हाड

शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता देहू-आळंदी रस्त्यावरील अनेक ठिकाणी होर्डिंग दिसण्यात अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, ‘गूगल अर्थ’वर झाडे तोडण्याआधीचे आणि तोडल्यानंतरचेही फोटो उपलब्ध असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र याची कोणतीच कल्पना नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 3 May 2023
  • 01:41 am
देहू-आळंदी रस्त्यावर होर्डिंगसाठी झाडांवर कुऱ्हाड

देहू-आळंदी रस्त्यावर होर्डिंगसाठी झाडांवर कुऱ्हाड

'गूगल अर्थ'वर वृक्षतोड झाली असल्याचे दिसत असूनही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी अनभिज्ञच

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता देहू-आळंदी रस्त्यावरील अनेक ठिकाणी होर्डिंग दिसण्यात अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, ‘गूगल अर्थ’वर झाडे तोडण्याआधीचे आणि तोडल्यानंतरचेही फोटो उपलब्ध असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र याची कोणतीच कल्पना नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

वृक्षतोड हा शहरातील प्रमुख समस्यांपैकी एक असलेला मुद्दा आहे. त्यातच किवळे-रावेत येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेला यश आले नव्हते. या पार्श्वभूमीवर आता शहरातील बहुतांश होर्डिंगसमोरील झाडांची कत्तल झाल्याची माहितीच आपल्याला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे होर्डिंग अनधिकृत की अधिकृत हा वाद सुरू असतानाच या झाडांची कत्तल केल्यावर लाखो रुपयांच्या लाकडांचे काय झाले? असा सवालदेखील आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, 'गूगल अर्थ'वर झाडे तोडण्यापूर्वीचे आणि नंतरचे फोटो उपलब्ध असताना याची जबाबदारी असणाऱ्या आणि रस्त्याने प्रत्यक्ष फिरून पाहणी करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी नदीपात्रानजीकची किती झाडे तोडावी लागतील याची माहितीदेखील पर्यावरण विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. खासगी जागांमधील होणाऱ्या झाडांच्या कत्तलीबाबत मत-मतांतरे असतानाच रस्त्यावरील झाडांची कत्तल होऊ लागली आहे.

यापूर्वी हिंजवडी रस्त्यावरील काही झाडांची अशाच प्रकारे कत्तल झाली होती. शहरात अधिकृत १४०० होर्डिंग असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे, तर अनधिकृत होर्डिंगचा आकडा यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.

'हरितशहर' म्हणून असलेली पिंपरी-चिंचवडची ओळख आता होर्डिंगवरील जाहिरातींसाठी पुसट होत चालल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील एका बँकेच्या दारात असलेला ३० वर्षांपूर्वीचा मोठा वृक्ष रातोरात बुंध्यापासून तोडण्यात आला, पण त्याची कोणतीच माहिती संबंधितांकडे नाही.

शहरातील झाडांची अशाच प्रकारे कत्तल वाढत राहिल्याने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे. होर्डिंगबरोबरच शहरात विविध कारणांसाठी केबलचे जाळे उभारणाऱ्यांकडूनही झाडांची कत्तल केली जात आहे. पिंपरी चौकातील मोठा वृक्षदेखील याच कारणासाठी तोडल्याचे दिसून येते.

पिंपरी-चिंचवड महापालिका हायटेक असल्याचा डंका अधिकाऱ्यांकडून पिटला जातो. अनेक पुरस्कारदेखील या मुद्द्यावरून महापालिकेने पदरात पाडून घेतले आहेत. पण चौकाचौकांतील झाडे रातोरात तोडली जात असल्याची माहिती महापालिकेकडे नाही, हे धक्कादायक आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story