टाळा परफ्युम, टॉर्च, सिगारेट आणि शेकोटी

जुन्नरजवळील माणमोडी डोंगरात असलेल्या भूतलेणी समूह येथे लेणी पाहण्यासाठी आलेल्या मुंबईच्या अकरा पर्यटकांवर काही दिवसांपूर्वी मधमाश्यांनी हल्ला केला. यात पाच पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या वर्षभरात २५ हल्ल्याच्या घटना झाल्या आहेत. या विषयातील तज्ज्ञांनी यामागे परफ्युमचा वास, रात्रीच्या वेळी टॉर्चचा पोळ्याच्या दिशेने झोत पाडणे, सिगारेट ओढणे किंवा शेकोटी पेटवणे अशी कारणे नोंदवली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 1 Apr 2023
  • 07:23 am
टाळा परफ्युम, टॉर्च, सिगारेट आणि शेकोटी

टाळा परफ्युम, टॉर्च, सिगारेट आणि शेकोटी

जुन्नर प्राचीन लेण्यांच्या परिसरात मधमाश्यांचा हल्ला टाळायचा असेल तर पाळा पथ्ये, तज्ज्ञांचे आवाहन, वर्षभरात हल्ल्याच्या २५ घटना, शेकडो पर्यटक जखमी

टाळा परफ्युम, टॉर्च, सिगारेट आणि शेकोटीविजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

जुन्नरजवळील माणमोडी डोंगरात असलेल्या भूतलेणी समूह येथे लेणी पाहण्यासाठी आलेल्या मुंबईच्या अकरा पर्यटकांवर काही दिवसांपूर्वी मधमाश्यांनी हल्ला केला. यात पाच पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या वर्षभरात २५ हल्ल्याच्या घटना झाल्या आहेत. या विषयातील तज्ज्ञांनी यामागे परफ्युमचा वास, रात्रीच्या वेळी टॉर्चचा पोळ्याच्या दिशेने झोत पाडणे, सिगारेट ओढणे किंवा शेकोटी पेटवणे अशी कारणे नोंदवली आहेत.  

जुन्नर तालुक्याच्या मानमोडी डोंगरावर अंबा-अंबिका, भीमाशंकर व भूतलेणी समूह आहेत. येथे प्राचीन लेणी समूह पाहण्यासाठी येणारे पर्यटक, सहलीसाठी आलेले विद्यार्थी तसेच लेणी अभ्यासकांची गर्दी होत असते. येथील काही प्राचीन लेण्यांत अनुकूल वातावरण व जागा उपलब्ध झाल्याने अनेक वर्षांपासून मधमाश्या वास्तव्य करून राहात आहेत. लेण्यात तसेच दर्शनी भागात आग्या मोहळाच्या मधमाश्यांची मोठी पोळी आहेत. आग्या मोहळाच्या  मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना सातत्याने घडतात. 

महेश माने, गिर्यारोहक म्हणाले, "पुरातत्त्व विभागाने योग्य दक्षता घेतली तसेच पर्यटकांनीदेखील आवश्यक काळजी घेतली तर अशा दुर्घटना टाळता येणे सहज शक्य होईल."

"येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील  मधमाश्यांची स्थाने तसेच पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती देणारे फलक लावण्याची मागणी जुन्नर पर्यटन संस्थेने मागील वर्षी केली होती. मात्र, आजपर्यंत ना फलक ना मधमाशीबाबत कार्यवाही केली. याबाबत पुरातत्त्व आणि वनविभाग एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होतात."

केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, "या लेण्यांची देखभाल करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. लेणी परिसरात गवत, झाडे-झुडपे वाढणे, पावसाळ्यात रस्ते-पायवाटा गवत वाढल्याने झाकून जाणे. लेण्यांमध्ये  मधमाश्यांची पोळी लागणे असे प्रकार घडत आहेत. देशी-विदेशी पर्यटकांवर आग्या मोहळातील माश्यांनी हल्ला चढवल्याच्या काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत."

स्थानिक वनरक्षक रमेश खरमाळे म्हणाले, "साधारण ट्रेक करताना  मधमाश्याच नाही तर सर्पदंशापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे प्रथमोपचाराची साधने म्हणजेच फस्ट एड किट हवं. मी एक बॅग सोबत ठेवतो. एकटं फिरत असताना माश्यांचा हल्ला झाला तर वाचवायला कोणी येऊ शकत नाही. त्यासाठी बॅगेत एक चादर असते. हात, तोंड झाकण्यासाठीचे साहित्य असतं. डोंगररांगांमध्ये फिरत असताना अत्तर/ परफ्युम, वासाचं तेल आम्ही वापरत नाही."

अशी घ्या काळजी

सिगारेट, तंबाखू, गुटखा, सुगंधी तेल किंवा अन्य तीव्र वासामुळे  मधमाश्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होऊन त्या चवताळतात. भडक रंगाचे कपडे व चष्म्यांचा वापर टाळा.  मधमाश्यांच्या वस्तीस्थानाजवळ (पोळे) उभे राहू नये. डोक्याभोवती मधमाश्या फिरत असतील तर त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्यास त्या डंख मारून जखमी करतात. माशीने डंख केला तर त्या जागी रगडू अथवा चोळू नये. मधमाश्यांच्या दंशापासून संरक्षण व्हावे यासाठी कपडे फार सैल किंवा तंग असू नयेत.

"परफ्युमच्या वासाने, कोणी सिगारेट ओढली किंवा जाळपोळ केली तर मधमाश्या हल्ला करत असतात. आपण त्यांच्या अधिवासात आलोय त्यामुळे मोबाईलचा फ्लॅशही वापरू नये. पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी एखादी मधमाशी आपल्याला चावली आणि आपण ती चुरगळली तर त्यातील कंपलहरी इतर मधमाश्यांपर्यंत पोहोचत असतात. मधमाश्या  धोका समजून लगेच हल्ला करतात."

सयाजी शिंदेंवर मधमाशी हल्ला...

अभिनेते सयाजी शिंदे  यांच्यावर मधमाश्यांचा हल्ला झाला होता. सयाजी शिंदे हे पुणे-बंगळुरू महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करत होते. यावेळी त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story