अपघात रोखण्यासाठी ८१ स्पॉटवर लक्ष

छोटे-मोठे अपघात रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलीस, परिवहन विभाग तसेच पुणे महापालिकेने विविध प्रयत्न करूनही मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांची संख्या कमी झालेली नाही. अपघातांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरातील ८१ स्पॉटला केंद्रस्थानी ठेवून अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 13 Mar 2023
  • 01:25 pm
अपघात रोखण्यासाठी ८१ स्पॉटवर लक्ष

अपघात रोखण्यासाठी ८१ स्पॉटवर लक्ष

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अॅक्शन प्लॅन, शहरातील काही िठकाणे केंद्रस्थानी ठेवून सुचवल्या विविध उपाययोजना

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

छोटे-मोठे अपघात रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलीस, परिवहन विभाग तसेच पुणे महापालिकेने विविध प्रयत्न करूनही मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांची संख्या कमी झालेली नाही. अपघातांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरातील ८१ स्पॉटला  केंद्रस्थानी ठेवून अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.

या अॅक्शन प्लॅनमध्ये प्रत्येक स्पॉटनुसार विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. पादचारी पूल, स्वतंत्र मार्गिका, गतिरोधक, सिग्नल, वाहतूक विषयक चिन्हांचे फलक त्याचप्रमाणे वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आरटीओकडून आग्रही भूमिका घेण्यात आली आहे.

आरटीओकडून पुणे जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अपघातांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. या अपघातांमध्ये पादचारी तसेच दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण जवळपास ९० टक्के आढळून आले आहे. तसेच प्राणांतिक अपघातही कमी झालेले नाहीत. या अनुषंगाने रस्ता सुरक्षा समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. त्यात आरटीओने अभ्यासपूर्ण आकडेवारी सादर करून महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत.  

या प्लॅननुसार आरटीओने पुणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांनुसार विविध ठिकाणे निश्चित केली आहेत. ही ८१ ठिकाणे असून त्याप्रमाणे उपाययोजना सुचविल्या आहेत. शहरातील बाजीराव रस्ता हा अत्यंत वर्दळीचा आहे. प्रामुख्याने शनिवारवाडा परिसरात मोठी कोंडी होते. तसेच शिवाजी रस्त्यावर दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात भक्तांची सातत्याने गर्दी असते. या ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येत नाही. चालण्यासाठी जागाही मिळत नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याची शिफारस प्लॅनमध्ये केली आहे.

डेक्कन जिमखाना परिसरात वाहनांची सातत्याने ये-जा असते. या परिसरात मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात. परिणामी वाहतूक कोंडी होते. हा परिसर नो पार्किंग झोन करण्याचे सुचविले आहे. गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठाकडून पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग, विधानभवन चौकात चोवीस तास सिग्नल यंत्रणा, मगरपट्टा चौक ते मारुती-सुझुकी शोरूमदरम्यान उड्डाणपूल, स्वारगेट येथील जेधे चौकात अतिक्रमणांवर कारवाई, पॉवर हाऊस चौकात सिग्नल अशा विविध उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत.

आरटीओसह वाहतूक पोलीस तसेच पुणे महापालिकेकडून या उपाययोजनांचा पाठपुरावा केला जाणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले की, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने इतर कार्यालयांच्या सहकार्याने अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना तसेच प्रबोधनपर कार्यक्रम हाती घेतले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मृतांचा आकडाही वाढला आहे. ही चिंतेची बाब आहे. अपघात कमी करण्यासाठी अपघातांचे स्पॉट निश्चित केले जात आहेत. तेथील स्थितीनुसार उपाययोजना सुचविल्या जात आहेत

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story