इनलाईन स्केटिंगवर नृत्य करत अथर्वचा विक्रम
#पुणे
अथर्व भांड या स्केटिंगच्या खेळाडूने वयाच्या १३ व्या वर्षी ११० एमएम रोलरवर इनलाईन स्केटिंगमध्ये नृत्य करून 'ग्लोबल जीनियस रेकॉर्ड'मध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शनिवारी (५ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृह, गंज पेठ येथे त्याने विक्रम केला.
अथर्वने २५ मिनिटे ४७ सेकंद इनलाईन रोलर स्केटिंगवर न थांबता छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास व शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयाला धरून त्यात गाणी व संवाद पेरून एक उत्तम नृत्य सादर करून नवा विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम पूर्ण होताच पालक व उपस्थित खेळाडू, प्रमुख पाहुण्यांनी टाळ्या व शिट्ट्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत अथर्वचे अभिनंदन आणि कौतुक केले. अथर्वच्या विक्रमाची ग्लोबल रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची घोषणा ग्लोबल जीनियस रेकॉर्डचे प्रशिक्षक विशाल देसाई यांनी केली.
या वेळी प्रमुख पाहुणे अशोक गुंजाळ, निवृत्ती अण्णा बांदल, धनंजय जाधव, राजेश्वरी जानकीरामण, मेघराज राजेभोसले, सुधीर देडगे, मयूर अडागळे, आदिती स्वप्नीलराजे होळकर, तनुजा देसाई, जयंत देशपांडे, राहुल गरुड, रेखा ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते.