चार दिवसांपूर्वी डांबरीकरण आणि लगेच खोदकाम

सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौक ते खुन्या मुरलीधर चौक दरम्यानच्या रस्त्यावर ४-५ दिवसांपूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. नुकतेच डांबरीकरण केलेला हा रस्ता आता खासगी कंपनीची केबल टाकण्यासाठी खोदण्यात येत आहे. एवढा खर्च करून डांबरीकरण झालेला रस्ता केबलसाठी उकरल्याने परिसरात पुन्हा धूळ, खड्डे झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पुन्हा वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 01:12 am
चार दिवसांपूर्वी डांबरीकरण आणि लगेच खोदकाम

चार दिवसांपूर्वी डांबरीकरण आणि लगेच खोदकाम

निंबाळकर तालीम ते खुन्या मुरलीधरपर्यंतचा रस्ता उकरला; पालिका प्रशासनाच्या उफराट्या कारभारामुळे नागरिक संतप्त

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौक ते खुन्या मुरलीधर चौक दरम्यानच्या रस्त्यावर ४-५ दिवसांपूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. नुकतेच डांबरीकरण केलेला हा रस्ता आता खासगी कंपनीची केबल टाकण्यासाठी खोदण्यात येत आहे. एवढा खर्च करून डांबरीकरण झालेला रस्ता केबलसाठी उकरल्याने परिसरात पुन्हा धूळ, खड्डे झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पुन्हा वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. रस्ता बांधून चार दिवस उलटायच्या आतच पुन्हा खोदकाम सुरू झाल्याने सर्वसामान्यांच्या करातून जमा झालेल्या पैशांचा अपव्यय होत असल्याची नागरिकांची भावना आहे.

निंबाळकर तालीम चौक ते खुन्या मुरलीधर चौक या ठिकाणच्या नुकत्याच डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर रिलायन्स जिओ या खासगी कंपन्यांची केबल टाकण्याचे काम चालू आहे. याला महापालिकेनेच  परवानगी दिली आहे. महानगरपालिकेने या कंपन्यांना खोदकामाची परवानगी देऊन नागरिकांच्या पैशांचा अपव्यय केला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणापूर्वीच त्यांनी हे केबलचे काम करून घ्यायला हवे होते. परंतु तसे करण्यात आले नाही. मोठ्या प्रमाणावर खर्च करून बांधलेला रस्ता पुन्हा चारच दिवसांनी खोदण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे महापालिका प्रशासनाचा बेपर्वाई कारभार प्रकाशझोतात आला आहे. या नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांच्या कररुपी पैशांचा अपव्यय होत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपासून मध्यवर्ती पेठांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सातत्याने रस्ते खोदाई सुरू आहे. त्यावर पुन्हा निम्न दर्जाची तात्पुरती डागडुजी करण्यात येते. काही दिवसांनंतर पुन्हा खोदाई सुरू. रस्ते खोदा, पुन्हा नव्याने तयार करा आणि तयार झाला की पुन्हा खोदा. यामुळे एकच रस्ता पालिका प्रशासन किती वेळा खोदते? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कार्यक्षम महानगरपालिकेच्या अशा उफराट्या कारभारामुळे नागरिकांना मात्र त्याचा फटका बसत आहे.  

या उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडी,  धूळ, खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाने शेकडो कोटी रुपयांची निविदा काढली आहे. त्यापूर्वी पथ विभागाने महावितरण, ड्रेनेज, पाणीपुरवठा विभागाला रस्ता दुरुस्त करण्याची माहिती देऊन काही काम असेल तर आधीच करून घ्या. नंतर पाच वर्षे खोदाई करता येणार नसल्याचे स्पष्टपणे कळवले आहे. मात्र त्यानंतरही शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीपुरवठा, ड्रेनेज विभागाने खोदाई केली आहे. खासगी कंपन्यांना रस्त्याखाली केबल टाकण्यासाठी आणि रस्ते खोदाईसाठी पालिकेतील पथ विभाग परवानगी देतो. त्यामुळे कोणती कंपनी कोणत्या रस्त्यावर खोदाई करणार आहे, याची माहिती या विभागाला असते. असे असतानाही चार दिवसांपूर्वी बांधलेल्या या रस्त्यावर खोदण्यास परवानगी देताना संबंधित अधिकारी झोपेत होते का, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

शेकडो कोटींच्या निविदा काढून संथ गतीने महापालिका रस्ते दुरुस्तीचे काम करते. मात्र  पुन्हा त्यावर खोदाई करण्यात येत असून त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, असे सार्वत्रिक चित्र दिसून येते. एकतर रस्त्याचे डांबरीकरण वेळेत होत नाही. झालेच डांबरीकरण तर रस्ता पुन्हा उकरण्यात येतो. सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौक ते खुन्या मुरलीधर चौक दरम्यानच्या रस्त्यावर झालेल्या निष्काळजीपणाबद्दल या कामाला परवानगी देणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच झालेला खर्च त्यांच्या वेतनातून वसूल करायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story