अिश्वनीताईंनी गड राखला, ‘काटें’ची टक्कर अपयशी

दुसरीकडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविणाऱ्या नेत्यांना बाजूला सारत मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे संपूर्ण निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, गेल्या निवडणुकीच्या निकालामुळे चर्चेत आलेल्या आमदार शेळके यांचा करिश्मा चिंचवड मतदारसंघात अजिबात चालला नसल्याचे निकालावरून दिसून आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 3 Mar 2023
  • 06:33 am
अिश्वनीताईंनी गड राखला, ‘काटें’ची टक्कर अपयशी

अिश्वनीताईंनी गड राखला, ‘काटें’ची टक्कर अपयशी

अिश्वनीताईंनी गड राखला, ‘काटें’ची टक्कर अपयशी

चिंचवड विधानसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी ३६ हजार ९१ एवढ्या भरीव मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. या विजयाने अश्विनी जगताप या िवधानसभेतील शहराच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांचा आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला.

मतमोजणीला सुरुवात झाल्यावर पहिल्या फेरीपासून अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. अश्विनी जगताप यांना एक लाख ३५ हजार ६०३ एवढी मते मिळाली असून नाना काटे यांना ९९ हजार ४३५ एवढी मते मिळाली. चर्चेत असणारे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना लक्षणीय म्हणजे ४४ हजार ११२ इतकी मते मिळाली.

महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार दिल्यास तो जगताप कुटुंबीयांच्या विरोधात निवडून येईल, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असलेला अतिआत्मविश्वास नडल्याचे मत स्थानिक राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. राहुल कलाटे यांनी केलेली बंडखोरी लक्षात घेण्यासारखी नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते व्यासपीठावरून सांगत  होते. त्यातच नाना काटे यांचा प्रचार पूर्ण मतदारसंघात फार जाणवत नव्हता. राष्ट्रवादीचे नेते कलाटे कसे चुकले हे सांगण्यात मग्न राहिले. 

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

दुसरीकडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविणाऱ्या नेत्यांना बाजूला सारत मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे संपूर्ण निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, गेल्या निवडणुकीच्या निकालामुळे चर्चेत आलेल्या आमदार शेळके यांचा करिश्मा चिंचवड मतदारसंघात अजिबात चालला नसल्याचे निकालावरून दिसून आला.

शहरातील गावकी-भावकीचे राजकारण नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पथ्यावर पडले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आणि नातेवाईक असलेल्या अनेक स्थानिक नेत्यांनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे उघड उघड काम केल्याचे दिसून आले.

शहरातील पाणी प्रश्न भाजपच्या विरोधकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराचा मुद्दा बनविला होता. मात्र, सर्वाधिक पाणी प्रश्न भेडसावत आहे त्या वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर भागातील नागरिकांनी भाजपच्या पारड्यात सर्वाधिक मते टाकल्याचे दिसते. काळेवाडी परिसर सोडला तर नाना काटे यांना कुठेच मतदानात आघाडी घेता आली नाही. राहुल कलाटे यांनी स्वतःच्या महापालिका प्रभागातील मते राखतानाच चिंचवडगाव तसेच पिंपळे सौदागर भागात देखील भाजप तसेच काटे यांची मते स्वतःकडे वळविण्यात यशस्वी ठरल्याचे दिसले. मात्र, भाजपने घरोघरी जाऊन केलेला प्रचार विजय खेचून आणण्यासाठी महत्त्वाचा ठरला .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधलेला संवाद आणि नागरिकांना येथे येऊन स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याचे दिलेले आश्वासन भाजपच्या विजयाचे एक प्रमुख कारण ठरले. शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या हाउसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट साधलेला संवाद देखील विजयाचा मार्ग मोकळा करणारा ठरला.

दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते शहरात आले आणि सत्ता कशी गेली, शिवसेना कशी संपविली. आमचे चिन्ह आणि नाव चोरले, सरकार पाडणारे आता मते मागत आहेत, असे मुद्दे नाना काटे यांच्या प्रचार सभेत उपस्थित करत होते. स्थानिक मुद्दे आणि प्रश्न मागे पडल्याने नागरिकांनी नाना काटे यांना या निवडणुकीत नाकारल्याचे आता दिसून येत आहे. या लक्षवेधी विजयात चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी केलेले परफेक्ट नियोजन महत्त्वाचे ठरले. त्यांच्यामुळे निकाल एकतर्फी खेचून आणता आला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रत्येक निवडणुकीत पडद्यामागची गणिते सांभाळणाऱ्या शंकर जगताप यांनी या निवडणुकीत सर्वच धुरा सांभाळली होती. खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनीही महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयासाठी आवश्यक नियोजन केले.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे विजय झाल्यानंतरही त्याचा जल्लोष करायचा नाही असा निरोप भाजप-शिवसेना महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना देण्यात आला होता. निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनी लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. यावेळी जगताप कुटुंबीयांसह उपस्थितांचे अखंड वाहणारे  अश्रू दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मृती जागवत होते. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story