पोलीस नाहीत म्हणून गुन्ह्यांचा तपासही नाही
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड आणि परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करून पाच वर्ष झाली. आयुक्तालयाच्या स्थापनेच्या वेळीच कर्मचारी संख्याबळ वाढण्याऐवजी कमी झाले होते. नंतरच्या काळात शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात या संख्याबळात वाढ झाली नाही. परिणामी पिंपरी-चिंचवडमधील सात पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांपैकी २४१७ गुन्ह्यांचा तपास रखडला आहे. पोलीस आयुक्तांनी नुकत्याच घेतलेल्या मासिक आढाव्यातून ही बाब समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर, आळंदी, चाकण, देहूरोड, तळेगाव दाभाडे आणि एमआयडीसीचा परिसर या आयुक्तालयाला जोडण्यात आला होता. पूर्वी शहरात पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, सांगवी, हिंजवडी, वाकड ही पोलीस ठाणी होती. तर कालांतराने चिखली, रावेत ही शहरातील तर चाकण मधील म्हाळुंगे पोलीस ठाणे नव्याने सुरू झाले. सध्या १८ पोलीस ठाण्यांमधून शहराचा कारभार चालवला जात आहे.
शहरातील पिंपरी, वाकड, हिंजवडी, चाकण, देहूरोड ही भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी पोलीस ठाणी आहेत. हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्याचे विभाजन करून वाकड पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. परंतु, आता याच वाकडमधून पिंपळेसौदागर आणि काळेवाडीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्यांची निर्मिती करणे प्रस्तावित आहे.
पिंपरीमधून पिंपरी गाव आणि कॅम्प परिसर वेगळा करण्यात येणार आहे. तर हिंजवडीमधून बावधन-सूस वेगळे होत आहे. चाकणमधून म्हाळुंगे वेगळे झाले असून, देहूरोडमधून रावेतला स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आहे. तसेच तळेगाव दाभाडे आणि देहूरोडमधील काही भाग एकत्रित करत शिरगांव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. मात्र, स्वतंत्र पोलीस ठाणे होण्यास अद्याप बराच कालावधी लागण्याची शक्यता असून, या मोठ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या वार्षिक गुन्ह्यांची संख्या ही एक हजारांहून अधिक होत असते. त्यामुळे दर वर्षाला दाखल होणाऱ्या दखलपात्र गुन्ह्यांपैकी सरासरी १० ते १५ टक्के गुन्हे तपासापासून प्रलंबित राहू लागले आहेत.
आयुक्तालय सुरू करताना मंजूर पोलीस संख्याबळानुसार कर्मचारी वर्ग करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यामुळे मुख्यालयातून शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्त करण्यात आले होते ते सर्व अतिरिक्त कर्मचारी काढून घेण्यात आले. त्यामुळे आयुक्तालय झाले पण साडे चारशेहून अधिक पोलिसांचे संख्याबळ पाच वर्षांपूर्वी कमी झाले होते. दरम्यान, मध्यंतरी झालेल्या पोलीस भरतीमधून शहराला सहाशे नवीन पोलीस कर्मचारी मिळाले आहेत. परंतु, या सर्वांना प्रशिक्षण झाल्यावर लगेचच नियुक्ती देणे शक्य नसल्याने गेल्या दीड वर्षात कमी मनुष्यबळात सर्व कामकाज चालत होते. आता यातील १०० पोलिसांची शहरातील १८ पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली असून, ६०० कर्मचारी सध्या मुख्यालयात नियुक्तीस आहेत.
ज्यांना शहरातील कामकाजाचा अनुभव आहे त्यांना मुख्यालयात ठेवण्यात आले असून, बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना पोलीस ठाणे, गुन्हेशाखेत नियुक्ती देण्यात आली आहे. परिणामी या पोलिसांना शहराची माहिती नसल्याने कामे प्रलंबित राहत आहेत. दरम्यान, प्रलंिबत गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.