महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्याला अटक
# पुणे
शहरातील उच्चभ्रू भागातील महिलांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या दिल्लीतील एकासह महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
चेतन मासी दासी (वय ३२, रा. वीरेंद्रनगर, दिल्ली), त्याची साथीदार कविता अनिल शर्मा (वय २२, रा. उत्तमनगर, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरातील उच्चभ्रू भागातील महिलांचे मोबाइल क्रमांक मिळवून चेतन दासी अश्लील संवाद साधत होता. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवत होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
तांत्रिक तपासात आरोपी चेतन आणि त्याची साथीदार कविता दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी दिल्लीत पोहोचले. पोलिसांनी दिल्लीतील २५० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. आरोपी गाझियाबाद परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर चेतन आणि कविता यांना पकडण्यात आले. दोघांना घेऊन पोलिसांचे पथक शहरात दाखल झाले. आरोपींकडून नऊ मोबाइल संच आणि सीमकार्ड जप्त करण्यात आले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त संदीपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड, उपनिरीक्षक मनीषा जाधव, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी आदींनी ही कारवाई केली.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.