धोकादायक पर्यटनाचा आणखी एक बळी

आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या भीमाशंकरकडे ट्रेकिंग करून येत असताना पिंपळे निलखमधील एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रमेश भगवान पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड भागातील पिंपळे निलख येथील रहिवासी होते. पुण्यात राहणाऱ्या आनंद सुभाष साळगावकर यांनी या ट्रेकचे आयोजन केले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 17 Jul 2023
  • 11:34 pm
धोकादायक पर्यटनाचा आणखी एक बळी

धोकादायक पर्यटनाचा आणखी एक बळी

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या भीमाशंकरकडे ट्रेकिंग करून येत असताना पिंपळे निलखमधील एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रमेश भगवान पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड भागातील पिंपळे निलख येथील रहिवासी होते. पुण्यात राहणाऱ्या आनंद सुभाष साळगावकर यांनी या ट्रेकचे आयोजन केले होते.

साळगावकर हे वकील आहेत. त्यांना गड आणि किल्ले फिरण्याचा छंद आहे. त्यांनी रमेश पाटील यांच्यासह दिनेश बोडके, मंजित चव्हाण, प्रवीण पवार, संदीप लोहकर, सुनील गुरव व आणखी तीन जणांनी मिळून पुणे ते भीमाशंकर असे २५ किलोमीटरचे पायी ट्रेकिंग करण्याचे ठरवले होते. रविवारी (दि. १६ ) रोजी सकाळी पावणे सात वाजता मावळ तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथून त्यांनी पायी चालायला सुरुवात केली. पायी चालत भीमाशंकरकडे येत असताना गुप्त भीमाशंकर येथे दुपारी अडीच वाजता खेड तालुक्याच्या हद्दीत रमेश पाटील अचानक चक्कर येऊन खाली पडले. यावेळी सर्वांनी त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांची काही हालचाल होत नव्हती व श्वास बंद झाला होता. त्यांना तोंडानेही कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु काहीच फरक पडला नाही. त्यानंतर १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिकेला कॉल केला. मात्र, त्यांच्याकडून लवकर प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून सर्वांनी उचलून रमेश यांना भीमाशंकर मंदिराजवळ आणले. 

घटनेची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांना देण्यात आली. रुग्णवाहिकेने पाटील यांना घोडेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून पाटील यांना मृत घोषित केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story