पुणे विद्यापीठाची अजून घसरगुंडी
सीविक मिरर ब्यूरो
पूर्वेकडील ऑक्सफोर्ड म्हणून कधी काळी पुण्याला ओळखले जायचे ते शैक्षणिक क्षेत्रातील वातावरणामुळे आणि प्रगतीमुळे. अलीकडच्या काळात पुण्याची ही ओळख आता पुसली जात आहे काय, असा प्रश्न निर्माण होण्यासारखी स्थिती होताना दिसते. याचे एकमेव कारण म्हणजे देशभर ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शैक्षणिक क्रमवारीत होणारी घसरण.
देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान कमालीचे घसरले आहे. विद्यापीठ सर्वच शैक्षणिक संस्थाच्या क्रमवारीत आता ३५ व्या स्थानावर पोहोचले आहे, तर विद्यापीठांच्या गटात १९ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. मागील वर्षी पुणे विद्यापीठ सर्वच संस्थांच्या गटात २५ व्या स्थानावर होते.
२०२० मध्ये विद्यापीठ गटात नवव्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठाची ही घसरण चिंता वाढवणारी आहे. मात्र, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ अजूनही प्रथम क्रमांकावर आहे.
विद्यापीठांच्या मूल्यांकनामध्ये शोधनिबंध, पेटंट, शोधनिबंधांचा दर्जा आदींसाठी इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स अर्थात आयपीआर हा विशेष रकाना आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला यात १५ पैकी चक्क शून्य गुण मिळाले आहेत. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीतही विद्यापीठाला २० पैकी फक्त एक गुण मिळाला आहे. विद्यापीठाच्या घसरलेल्या रॅंकिंगमुळे एकंदरीत कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.