पिंपरी-चिंचवडमध्ये अण्णा-दादांची हातमिळवणी
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यासाठी 'आदर्श' शहर असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असणारे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यातील परस्परसहमतीने सत्ता चालवली जाणार असल्याचे दिसून येते, तर दुसरीकडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांनी आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची २५ वर्ष सत्ता असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका २०१७ मध्ये भाजपने एकहाती खेचून आणली. विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे हे २०१४ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले, तर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते, तर पिंपरी विधानसभेला शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे निवडून आले होते. परंतु, त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर राष्ट्रवादीमधून फुटून गेलेले आणि मूळचे भाजपचे असे एकूण ७७ जण नगरसेवक म्हणून निवडून आले, तर ५ अपक्षांनी स्वतंत्र गट स्थापन करून भाजपला पाठिंबा दिला.
दरम्यान, त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला भोसरी विधानसभेतून महेश लांडगे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून ते विजयी झाले, तर चिंचवड विधानसभेला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपच्या चिन्हावर तर अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्ह्यावर १८ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे घेतलेल्या शपथविधीला आणि एकूणच या संपूर्ण प्रक्रियेत अण्णा बनसोडे हे कायम अजित पवार यांच्या बरोबर राहिले होते. शरद पवार यांनी वैयक्तीक फोन करून प्रत्येक आमदारांना परत बोलाविल्याने ८२ तासांत हे सरकार पडले होते. पण अण्णा बनसोडे हे अजित पवार यांच्याबरोबरच राहिले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर अडीच वर्षांनी पुन्हा सत्तांतर झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर अण्णा बनसोडे हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले होते. त्यांचा मुंबईतील मुख्यमंत्र्यांबरोबरचा प्रवास आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला भेट दिल्याने बनसोडे हे शिवसेना शिंदे गटातून लढतील, असे बोलले जात असतानाच त्यांनी मी अजित पवार यांच्याबरोबरच असल्याचे जाहीर केले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील विश्वासू सहकाऱ्यांमध्ये आमदार महेश लांडगे यांचा समावेश आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर आमदार लांडगे यांना मंत्रिपद मिळू शकते असे बोलले जात होते. दिवंगत आमदार जगताप आणि आमदार लांडगे या दोघांनी गेल्या पाच वर्षात महापालिका आणि एकंदरीत संपूर्ण शहरातील राजकारण आपल्या भोवती फिरते ठेवले आहे. मात्र, राज्यातील सत्ता समीकरण पुन्हा एकदा बदलल्याने मुख्यमंत्री शिंदेंच्या जवळ गेलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार बनसोडे यांचा शहरातील राजकारणात पुन्हा वरचष्मा राहणार आहे. आमदार बनसोडे यांची २०१९ ला विधानसभेची उमेदवारी अचानक कापून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना देण्यात आली होती. तर ही उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परत दिल्यावर बनसोडे हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यामुळे आता राज्यातील सत्तासमीकरण बदलत गेल्याने आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आमदार बनसोडे आणि आमदार महेश लांडगे यांच्या परस्पर सहकार्याने शहर चालवले जाईल असे बोलले जात आहे.
परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर-शहाराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी शरद पवार यांची भेट घेत आम्ही तुमच्या बरोबर असल्याचे जाहीर केले आहे. तर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही माजी नगरसेवक देखील शरद पवार यांच्याबरोबर असतील असे बोलले जात असून, युवा आणि तरुण नगरसेवक मात्र अजित पवार यांच्याबरोबर असल्याचे दिसून येते.
पक्षांतर केलेल्यांची कुचंबणा
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळेस भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये अनेकांनी प्रवेश केला होता. यामध्ये माजी नगरसेवकांचा समावेश होता. आता यातील अनेकांची कुचंबणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
व्यक्ती पाहून होणार मतदान
राष्ट्रवादी काँग्रेसने शहराला 'आदर्श' शहर असा नावलौकिक मिळवून दिला. त्यातील त्रुटी दाखवित महापालिकेची सत्ता भाजपने खेचून नेली. त्यानंतर विधानसभेला भाजपचे दोन आमदार निवडून आले. त्यानंतर २०१४ पासून प्रत्येक विकास प्रकल्पात तसेच अन्य कामकाजात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांवर विविध आरोप केले. पण आता हे एकत्र आल्याने यापुढील महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकाला आम्ही व्यक्ती बघूनच मतदान करू अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर दिवसभर व्हायरल झाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.