अँग्री ओल्ड मॅनने ‘वाजवला’ डीजे !
विजय चव्हाण
डीजेच्या दणदणाटाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने थेट साऊंड सिस्टीम फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. डीजेच्या आवाजाच्या त्रासामुळे चिडलेल्या ज्येष्ठ नागरिकाने लग्न समारंभात जाऊन वायर, मशीन, स्पीकर तोडून टाकत तब्बल १० लाख रुपयांचे नुकसान केले आहे. पुण्यातील कोंढवा खुर्द भागात बुधवारी (दि. ८) घटना घडली. अब्दुल रिसालदार यांनी या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक सत्यबीर बंगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च रोजी कोंढवा भागात असणाऱ्या कोरियंटल रिसॉर्ट अँड क्लब या ठिकाणी बॉलरूममध्ये एक विवाह सोहळा आयोजित होत होता. विवाह समारंभ असल्यामुळे या ठिकाणी डीजे सिस्टीम लावण्यात आली होती. सत्यबीर बंगा यांचे घर या रिसॉर्टपासून काही अंतरावर आहे. दरम्यान, या लग्न समारंभात सुरू असलेल्या डीजे साऊंड सिस्टीमच्या आवाजाचा त्रास होत असल्याने बंगा यांनी थेट रिसॉर्टमध्ये विनापरवानगी प्रवेश केला.
ज्या ठिकाणी समारंभ सुरू होता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सुरू असलेल्या साऊंड सिस्टीमच्या वायर तोडून टाकल्या. इतकचं काय तर रागाच्या भरात त्यांनी एलईडी ऑपरेटरचा लॅपटॉपदेखील फोडला आणि इतर सगळ्या वस्तूंचे नुकसान केले. या सगळ्या साऊंड सिस्टीमची किंमत सुमारे १० लाख रुपये होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगा यांचे घर या रिसॉर्टपासून काही अंतरावर आहे. या आधीदेखील त्यांनी अशा अनेक कार्यक्रमात जाऊन गोंधळ घातले आहेत. बंगा यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ४२७, ४५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील काही पब आणि हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्या ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी लावून सार्वजनिक शांततेचा भंग केला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंढवा तसेच हडपसर पोलिसांच्या हद्दीतील आठ हॉटेल आणि पबवर कारवाई केली होती.
तज्ञांच्या मते, ध्वनिप्रदूषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. ध्वनिप्रदूषणामुळे आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येणे, मायोकार्डियल इंफ्रॅक्शन म्हणजे हार्ट अॅटॅक येणं किंवा स्ट्रोकसारखे त्रास होऊ शकतात. सतत मोठा आवाज कानावर पडला तर बहिरेपणा येण्याची शक्यता असते. मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतल्या पेशींना इजा होते. त्यामुळे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.