फी वसुलीसाठी ‘एंजल’ बनली राक्षस!
यशपाल सोनकांबळे
TWEET@yashpal_mirror
फी वसूल करण्यासाठी सुमारे १०० विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रयोगशाळेत डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर येथील एंजल्स इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ही घटना सोमवारी (दि. २४) घडली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन पालकांच्या मदतीने मुलांची सुटका केली. शेकडो पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
फी भरली नसल्याने मला वर्गात जाऊ देत नाही, असे एका विद्यार्थ्याने फोन करून पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनी सामाजिक कार्यकर्ते नीलेश काळभोर यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने शाळेत धाव घेतली. यावेळी सुमारे १०० विद्यार्थ्यांना वर्गात बसविण्याऐवजी प्रयोगशाळेत बसविले असल्याचे त्यांना दिसून आले.
या संदर्भात ‘सीविक मिरर’शी बोलताना नीलेश काळभोर म्हणाले, ‘‘सकाळी अकराच्या सुमारास मला समजले की, फी न भरल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना वर्गात जाऊ दिले जात नाही. त्यांना प्रयोगशाळेत बसवण्यात आले आहे. आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा सुमारे १०० विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत डांबल्याचे पाहून आम्हाला धक्का बसला. प्रयोगशाळेला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना कुलूप का लावले, अशी विचारणा केली असता त्यांची बोलती बंद झाली होती.’’
‘‘शाळेचे शुल्क भरणे हे पालकांचे कर्तव्य आहे. परंतु शाळा प्रशासन मुलांशी ज्या पद्धतीने वागले, ते पूर्णपणे चुकीचे आणि अमानुष आहे. शाळेचे संचालक सचिन अग्निहोत्री यांच्याशी याबाबत चर्चा केली जाणार आहे. एक महिन्याची फी भरूनही शाळा प्रशासनाने शिक्षा केल्याने मुलांना शाळेत कसे पाठवायचे, अशी चिंता आम्हा पालकांना सतावत आहे,’’ अशी प्रतिक्रिया पालक प्रतिनिधी धनंजय काळभोर यांनी व्यक्त केली.
प्रयोगशाळेत डांबून ठेवण्यात आलेल्या एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की ‘‘सोमवारी काही पालकांचा फोन आला की, मुलांना प्रयोगशाळेत डांबून ठेवले आहे. पालकांना तातडीने फी भरण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही शाळेच्या गेटबाहेर जमलो. ‘आमच्या मुलांशी गैरवर्तन का करता,’ असा जाब मुख्याध्यापकांना विचारला. त्यांनी या विषयावर पालकांची बैठक बोलवायला हवी होती.’’
‘सीविक मिरर’ ने या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन घटनेची चौकशी करावी, असे निर्देश आम्ही दिले आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात येईल.’’
एंजल्स हायस्कूलच्या प्राचार्या शमशाद कोतवाल यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्या म्हणाल्या, ‘‘शेकडो विद्यार्थ्यांची फी गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित आहे. आम्ही सर्व पालकांना थकबाकी भरण्याची विनंती करत आहोत. परंतु ते दखल घेत नाहीत. विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत कोंडून ठेवल्याचा आरोप निराधार आणि चुकीचा आहे. फी न भरल्यामुळे आम्ही कोणालाही परीक्षेला बसू दिले नसल्याचा दावा चुकीचा आहे. सर्व विद्यार्थी आधीच प्रयोगशाळेत बसले होते. या संदर्भात आम्ही पालकांसोबत बैठक घेतली. आता सर्व पालकांना संचालक सचिन अग्निहोत्री यांच्याशी याबाबत चर्चा करायची आहे.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.