अज्ञाताने बैलावर केले धारदार शस्त्राने वार

पर्वती दर्शन येथील बालवीर मित्र मंडळाजवळ जखमी अवस्थेतील एका बैलाला प्राणी प्रेमींनी उपचारासाठी भूगाव येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सोडले आहे. शनिवारी (२५ मार्च) सकाळी या परिसरात एक बैल जखमी अवस्थेत बसलेला होता. त्याच्या अंगावरील डाव्या बाजूला पाच-दहा इंचाची एक जखम झाली होती. त्यातून सतत रक्ताच्या धारा वाहात होत्या. या जखमेवर माश्या बसलेल्या होत्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Mar 2023
  • 11:14 am
अज्ञाताने बैलावर केले धारदार शस्त्राने वार

अज्ञाताने बैलावर केले धारदार शस्त्राने वार

विक्षिप्त व्यक्तीने नशेत केले मुक्या जनावरावर वार; उपचारासाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टमध्ये केले दाखल

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पर्वती दर्शन येथील बालवीर मित्र मंडळाजवळ जखमी अवस्थेतील एका बैलाला प्राणी प्रेमींनी उपचारासाठी भूगाव येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सोडले आहे. शनिवारी (२५ मार्च) सकाळी या परिसरात एक बैल जखमी अवस्थेत बसलेला होता. त्याच्या अंगावरील डाव्या बाजूला पाच-दहा इंचाची एक जखम झाली होती. त्यातून सतत रक्ताच्या धारा वाहात होत्या. या जखमेवर माश्या बसलेल्या होत्या. उन्हाच्या झळा आणि जखम याने तो थकला होता. प्राणी प्रेमी 'वाईल्ड ॲनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन'चे आनंद अडसूळ, 'द्वारकाधीश गोरक्षा गोशाळा ट्रस्टचे' शिवाजी गरुड, 'गोसेवा प्रतिष्ठान'चे अनिल जोरी, किशोरजी रामाने यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी भूगावला सोडले आहे.

पर्वती दर्शन परिसरात या बैलावर कोणा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे त्याच्या पाठीवर खोलवर जखम झालेली होती. त्याला बराच मार लागलेला होता. त्याच्या जखमेतून रक्त वाहात होते. त्यामुळे भर उन्हाच्या झळा आणि जखमांवर माश्या चावा घेत असल्याने तो पूर्ण थकून गेला होता. स्थानिक नागरिकांनी त्याचे फोटो काढून व्हाट्सॲप वर टाकले आणि यावर काही मदत करता येईल का, अशी विचारणा केली. त्यावर त्यांना आनंद अडसूळ यांचा संपर्क करून देण्यात आला. अडसूळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गोरक्षक संस्थेच्या व्यक्तींना बोलावले आणि सगळ्यांनी मिळून या जखमी बैलाला उपचारासाठी घेऊन जायचा निर्णय घेतला.

प्राण्यांना पकडायला गेल्यावर प्रथम ते घाबरतात. पळण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला मारायला कोणीतरी आले आहे, असे त्यांना वाटते. अशा वेळी सावधपणे त्यांच्या जवळ जावे लागते. असे अडसूळ म्हणाले. बैलाला पकडण्यासाठी जवळ जाताच तो बुजून पळू लागला. येथील गर्दीच्या ठिकाणी पकडणे कठीण काम होते. लोकवस्तीमध्ये भला मोठा बैल पकडणे हे एक मोठे आव्हानच होते. येथे रहदारीचा रस्ता, लहान मुले खेळत होती, वृद्ध आणि महिला आजूबाजूला होत्या. काही गडबड झाली तर बैल वाचवण्याच्या नादात मोठा अपघात होण्याची शक्यता होती. अडसूळ यांनी शिवाजी गरुड, अनिल जोरी, किशोरजी रामाने, स्थानिक नागरिक योगेश शिवले, चेतन इंगळे, सारंग मोरे, नरेंद्र अडसूळ, संकेत सागर, गोपाल राऊत, सुनील अडसूळ, राजेंद्र बेलापूरकर, योगेंद्र शहाणे यांच्या मदतीने त्याला पकडले.

रस्त्यावरील अपघातात जखमी होणाऱ्या माणसांच्या मदतीला फारसे कोणी जात नाही तर जखमी प्राण्यांच्या मदतीला जायची गोष्टच नाही. विविध अपघात, नैसर्गिक आपत्ती यात जखमी होणाऱ्या पशू, पक्षी आणि प्राण्यांकडे अनेकांचे दुर्लक्षच होत असते. परंतु या ठिकाणी प्राणी प्रेमींनी  जखमी प्राण्याला उपचारासाठी पाठवून वेगळ्या संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला आहे. बरेच प्राणी रस्त्यावर फिरत असतात. कुत्रे, गायी, बैल यांना कोणी वालीच नसतो. त्यांना दुखापती होतात. ते आजारी पडतात. पण त्यांच्याकडे फारसे कोणाचे लक्ष नसते. त्यांना आपल्या मदतीची गरज असते.  

प्राण्यांवर प्रेम करण्याबरोबरच त्यांची काळजीही घेतली पाहिजे. त्यांना त्यांच्या समस्या सांगता येत नाहीत. सोशल मीडियावर प्राण्यांना त्रास देत असल्याचे व्हीडीओ पाहायला मिळतात. प्राण्यांचा त्रास समजून घेणे आपले कर्तव्य आहे. प्राण्यांबाबत आपल्याकडे पुरेशी संवेदनशीलता जोपासली गेली पाहिजे. काही विक्षिप्त लोक नशेत असताना प्राण्यांना त्रास देतात. त्यांच्यावर वार केले जातात. प्राण्यांना कोणी त्रास देताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा  गोसेवा प्रतिष्ठानच्या अनिल जोरी यांनी दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story