'99 एकर्स'वरील एक जाहिरात पडली ९९ हजारांना
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
एका फ्लॅटमालकाला '९९ एकर्स' या संकेतस्थळावर फ्लॅट भाड्याने देण्याची जाहिरात करणे ९९ हजार रुपयांना पडले आहे. ही जाहिरात पाहून भारतीय सैन्यदलात असल्याचे भासवत आरोपींनी घरमालकालाच गंडा घातला आहे. प्रवीण सुभाषराव कुलकर्णी (वय ४९, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवकुमार तिवारी, कॅप्टन जोरासिंग बरिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलकर्णी यांना त्यांचा फ्लॅट भाड्याने द्यायचा होता. त्यासाठी त्यांनी याची जाहिरात ‘९९ एकर्स’ या संकेतस्थळावर दिली. त्यानंतर आरोपींनी फोन करून आम्ही भारतीय सैन्य दलात असून, आमची बदली पिंपरी-चिंचवड जवळ झाली आहे. त्यामुळे तुमचा फ्लॅट भाड्याने हवा असल्याचे सांगितले. त्यासाठी २५ हजार रुपये दोन टप्प्यात देतो, असे सांगण्यात आले. त्यासाठी कुलकर्णी यांच्या गुगुल-पे वरील क्युआर कोड आणि अन्य डिटेल्सची माहिती घेण्यात आली. त्यानंतर आरोपींनी कुलकर्णी यांच्याच बँक खात्यातून दोन टप्प्यात ९९ हजार रुपये काढून घेतले.
बँकेची काही तरी गडबड झाली असल्याचे भासवून आरोपींनी कुलकर्णी यांच्या बँक खात्यातून गुगल पेच्या माध्यमातून ४९ हजार रुपये काढून घेतले. सावंतवाडी, जयपूर, मध्यप्रदेश (आमला जिल्हा) या तीन भागात हे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. त्याचबरोबर कुलकर्णी यांच्या बँक खात्यातून सावंतवाडी येथील बँक खात्यात ५० हजार तर जयपूर येथील बँक खात्यात ४९ हजार रुपये वर्ग झाल्याचे उघड झाले असून, सावंतवाडी येथील बँक खात्यातून हे पैसे मध्यप्रदेश राज्यातील आमला या जिल्ह्यातील एका खासगी बँक खात्यात वर्ग झाल्याचे तपासात उघड झाले आहे. चिखली पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.