अक्षय़ तृतीया : दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
अक्षय तृतीयेनिमित्त पुण्याचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. यावेळी प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवा अंतर्गत गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्या दाखवण्यात आला आहे. पहाटेपासूनच गणपती मंदिरात स्वराभिषेकाचा देखील कार्यक्रम झाला.
पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे आणि परिवाराच्या वतीने हा महानैवेद्य देण्यात आला आहे. गणपती बाप्पाला दाखवण्यात आलेल्या आंब्यांचा महानैवेद्य ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे.