अजितदादा, देर आये, दुरुस्त आये!
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
अजितदादा पवार साहेब... अशी भाषणाची सुरुवात करीत, तुम्ही उशिरा का होईना पण आता योग्य ठिकाणी बसला आहात. तुम्ही आमच्यासोबत आल्यावर आपण प्रथमच एकत्र व्यासपीठावर आहोत; हीच जागा तुमच्यासाठी योग्य होती, असे विधान केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर अमित शाह यांनी अजित पवारांना उद्देशून केलेले हे विधान या राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे.
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते केंद्रीय निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वेब पोर्टलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. त्यावेळी शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलून सभागृहातील वातावरण हलके केले.
शाह म्हणाले की, अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्या सोबत मी प्रथमच कार्यक्रम करीत आहे. मी दादांना एक गोष्ट सांगू इच्छितो. दादा, तुम्ही खूप कालावधीनंतर योग्य ठिकाणी बसला आहात. हीच जागा योग्य होती. पण आपण खूप उशीर लावलात. शाह यांच्या या वक्तव्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि हशा पिकला
शाह गुजरातचे पण प्रेम महाराष्ट्रावर
अजित पवारांनीही मोदी, शहा यांच्याबाबत यावेळी स्तुतिसुमने उधळली. पवार म्हणाले, मी वेगळा निर्णय घेण्यामागे काय कारणे आहेत, असा अनेकांना प्रश्न पडतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाचे नेतृत्व करू शकतात. त्यामुळेच हा मोठा निर्णय घेतला. शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे भले तेच करू शकतात.
शाह गुजरातमधून येतात, पण त्यांचे महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासूरवाडीवर जास्त प्रेम असते, असे पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास व वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे, असेही पवार म्हणाले.
महाराष्ट्र शाह यांची जन्मभूमी - फडणवीस
अमित शाह यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे. त्यांचा जन्म मुंबईतला आहे. अमित शहा यांना महाराष्ट्र खूप चांगला कळतो. अजितदादा म्हणाले ते महाराष्ट्राचे जावई आहेत. हे खरे आहे, मात्र त्यांचा जन्म मुंबईतला आहे. त्यांची कर्मभूमी गुजरात आणि दिल्ली असली, तरी त्यांची जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे. म्हणूनच ते महाराष्ट्राचा विचार अधिक करतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.