मासिक पाळीत केले महिलेसोबत 'अघोरी' कृत्य
#विश्रांतवाडी
एका महिलेला गर्भधारणा होण्यासाठी ‘अघोरी पूजे’च्या नावाखाली मानवाच्या हाडांची पावडर सेवन करण्यास भाग पाडल्याची घटना शहरात जानेवारीमध्ये घडली होती. या घटनेचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले असतानाच पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एका महिलेसोबत अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मासिक पाळी सुरू असताना एका महिलेशी अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात एका २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कथले (सर्व रा. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या आरोपींविरुद्ध आरोपींच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, शारिरिक, मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमांन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहानंतर ही महिला बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. २६ जून २०१९ पासून तिचा पतीसह नातेवाईकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. मासिक पाळीदरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले. या छळास कंटाळून ती माहेरी आली, असे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम करीत आहेत.
feedback@civicmirror.in