आवारेंच्या हत्येनंतर गुन्हेगार निर्ढावले

किशोर आवारे यांच्या हत्येचा कथित सूड उगवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या भावाच्या खुनाचा कट आणि व्यावसायिक वादातून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा रचण्यात आलेला कट उघड झाल्याने गुन्हेगारांची अशी कृत्ये करण्यासाठी वाढलेली हिंमत पोलिसांबरोबरच आता नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय ठरू पाहत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 29 Jun 2023
  • 08:19 am
आवारेंच्या हत्येनंतर गुन्हेगार निर्ढावले

आवारेंच्या हत्येनंतर गुन्हेगार निर्ढावले

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय व्यक्तींच्या खुनाचे दोन कट उघडकीस, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

किशोर आवारे यांच्या हत्येचा कथित सूड उगवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या भावाच्या खुनाचा कट आणि व्यावसायिक वादातून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा रचण्यात आलेला कट उघड झाल्याने गुन्हेगारांची अशी कृत्ये करण्यासाठी वाढलेली हिंमत  पोलिसांबरोबरच आता नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय ठरू पाहत आहे.

माथाडी व्यवसायाच्या वादातून सराईत गुन्हेगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि सध्या भाजपमध्ये दाखल झालेले पुनावळे-रावेत भागातील शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने उघड केला आहे. त्याचबरोबर किशोर आवारे यांच्या हत्येचा कथित बदला घेण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील दोघा सराईतांनी आमदार सुनील शेळके यांचा भाऊ आणि आवारे खून प्रकरणातील आरोपी सुधाकर शेळके यांचा पोलीस बंदोबस्ताच खून करण्याचा कट दरोडा प्रतिबंधक विभागाने उधळून लावला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यामागे खासकरून माथाडीच्या नावाखाली चालणारी एमआयडीसीतील गुन्हेगारी, जमिनींच्या व्यवहारातून होणाऱ्या हत्या, वाढता स्ट्रीट क्राईम आणि राजकीय गुन्हेगारीला वाढते खतपाणी ही प्रमुख कारणे होती. राजकीय स्थितंतरामुळे शहराला पाच वर्षात पाच पोलीस आयुक्त लाभले आहेत. मात्र,

एकाही पोलीस आयुक्तांना राजकीय नेत्यांनी दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करू दिलेला नाही. आवारेंचा पूर्वइतिहास आणि त्यांनी स्वत:ची बदललेली प्रतिमा तसेच तळेगाव दाभाडे येथील राजकीय समीकरणे यामुळे अनेकांचे आवारे यांच्याशी खटके उडाले होते. सध्या या प्रकरणात माजी नगरसेवक भानू खळदे याला आवारे यांनी मारलेली कानशिलात हे हत्येचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पोलिसांनी याबाबत अद्यापही अधिकृतपणे कोणतेच भाष्य केलेले नाही.

दुसरीकडे आवारे यांच्या अंत्यविधीला त्यांचा मोठा चाहता वर्ग जमला होता. तेव्हाच काही जणांनी आम्ही या घटनेचा आमच्या पातळीवर बदला घेऊ असे उघड-उघड भाष्य केले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक कुंडली तयार करून आवारे यांच्या हत्येनंतर काय-काय घडू शकते, याचा अभ्यास सुरू केला. त्यातूनच दरोडा प्रतिबंधक विभागाचे सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी दोघा सराईतांना चार पिस्तुले आणि जिवंत काडतुसांसह अटक केली.

या अटकेपूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा हत्येचा कट रचला गेला होता. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चित्रित झाल्याप्रमाणे हिंजवडी भागातील कंपन्यांमध्ये ठेका मिळविण्यासाठी अनेकदा हाणामाऱ्या झाल्या आहेत. ओव्हाळ यांनी माथाडीचा चालू असलेला ठेका काढून घेत तेथे अन्य लोकांना काम दिल्याने तिघा सराईत गुन्हेगारांशी ओव्हाळ यांचा वाद झाला होता. या वादातून ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचून तडीपार गुंडाकडून पिस्तुले आणण्यात आली होती. या पिस्तुलांमधून ओव्हाळ यांच्यावर गोळीबार करण्यात येणार असल्याचे समजल्याने निरीक्षक अरविंद पवार यांनी आरोपींना पकडले.

सहायक निरीक्षक देशमुख आणि निरीक्षक पवार यांनी मोठ्या शिताफीने आरोपी पकडल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून कळविण्यात आले. परंतु, या आरोपींचा उद्देश लपविण्याचा प्रयत्न आयुक्तालय स्तरावरून होताना दिसत आहे. शहरात अचानक पिस्तुले कुठून येऊ लागली, हे आता न उलगडणारे कोडे ठरले आहे. तीन वर्षांपूर्वी एकाच वेळेस ४५ पिस्तुले आणि काडतुसे जप्त करण्याची महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱ्या कर्मचाऱ्याला सध्या पोलीस मुख्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तर गुन्हे शाखेत अनेक संलग्न कर्मचारी-अधिकाऱ्यांची भरती झाली आहे. तांत्रिक मुद्यावर एका ठिकाणाहून दुसरीकडे बदली करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अनेकांची कागदोपत्री नियुक्ती एकीकडे तर त्यांचे कामकाज भलतीकडेच ‘संलग्न’च्या नावाखाली सुरू आहे.

पोलीस आयुक्तालय सुरू करताना केवळ पिंपरी-चिंचवड नाही तर त्याच्या आसपासच्या खेडेगावांचा आणि दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे, लष्करी दारूगोळा-फॅक्टरीचा परिसर आणि आयटी-बीटी पार्क बरोबरीनेच एमआयडीसीचा भाग सामावून घेण्यात आला. परंतु, या भागातील राजकीय गुन्हेगारी आणि राजकीय गुन्हेगारांच्या हत्येसाठी होणारा शस्त्रांचा वापर रोखण्यात पोलीस कमी पडताना दिसत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story